जिल्ह्यात आता ‘स्वाईन फ्लू’ आजाराचे रुग्ण वाढत असतानाही अद्याप या रुग्णांसाठी मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी स्वतंत्र वार्ड नाही. त्यामुळे अचानक रुग्णसंख्या वाढली तर काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या महिन्याभरात स्वाईन फ्लूचे तब्बल १४ रुग्ण आढळले. त्यातील १२ रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. एकूण रुग्णांतील सहा रुग्ण बरे होऊन घरी परतले असले तरी ८ गंभीर रुग्ण विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. नागपूर विभागात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण २००९ मध्ये आढळला होता. त्यानंतर सुरुवातीला प्रत्येक वर्षी रुग्ण आढळण्यासह त्यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आढळत होते. हा संक्रमित होणारा आजार असल्याने मेडिकल-मेयो या दोन्ही रुग्णालयांत रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड आरक्षित केला जात होता.

या वार्डांमध्ये रुग्णांसाठी आवश्यक औषधी, तज्ज्ञ डॉक्टर, तज्ज्ञ परिचारिका, जीवनरक्षण प्रणाली असलेल्या रुग्णशय्या, आरोग्य कर्मचारी नियुक्त होत होते. त्यामुळे हे रुग्ण येताच वेळीच त्यांच्यावर उपचार सुरू होत होते. या वार्डासोबत स्वाईन फ्लू संशयितांसाठीही स्वतंत्र सोय राहत होती. त्यामुळे या रुग्णांमुळे इतरांमध्ये आजाराचे संक्रमण होत नव्हते. परंतु करोना सुरू झाल्यापासून स्वाईन फ्लूग्रस्तांसाठी स्वतंत्र वार्ड व उपचारासाठी आवश्यक औषध खरेदीच्या सूचना येणे बंद झाले. त्यातच करोनाच्या पहिल्या दोन वर्षांत नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले नाही. परंतु हल्ली महिन्याभरात तब्बल १४ नवीन रुग्ण आढळले.

मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण नाही. परंतु, हे रुग्ण आढळल्यास आवश्यक संख्येने जीवनरक्षण प्रणालीसह औषधांची सोय आहे. त्यामुळे वेळीच उपचार होऊ शकतात. तूर्तास केंद्र व राज्य सरकारकडून या रुग्णांसाठी स्वतंत्र सोय करण्याची सूचना नाही.
– डॉ. अतुल राजकोंडावार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No swine flu ward in government hospital of nagpur scsg