वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी माजी पालकमंत्री सुनील केदार यांच्या नावावर कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवाराबाबत चाचपणी करण्याबाबत लोकसभा मतदारसंघ प्रभारी म्हणून माजी पालकमंत्री आ.सुनील केदार यांची आज सभा झाली. यावेळी विविध नेत्यांनी मत प्रदर्शन केले. केदार हे जिल्ह्याचे पालकमंत्री राहले असून ते सातत्याने वर्धा काँग्रेसशी जुळून राहले. त्यामुळे ते सर्वात सक्षम उमेदवार ठरतात. वर्धेची जागा काँग्रेसनेच लढावी. कारण हा गांधी जिल्हा आहे.
मित्रपक्षांना ही जागा वाटाघाटीत बहाल करू नये. काँग्रेसने ही जागा लढतांना सक्षम उमेदवार द्यावा. उमेदवारी लवकर घोषीत करावी. लोकसभा निवडणूकीसाठी विविध जबाबदाऱ्यांचे लवकर वाटप करावे. भाजप उमेदवाराचा पराभव करण्याची जनतेची मानसिकता झाली आहे. काँग्रेसस भाजपचा पराभव करू शकते, अशी भावना विविध कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. निरीक्षक म्हणून झिया पटेल उपस्थित होते.
यावेळी आमदार रणजित कांबळे, अमर काळे, शेखर शेंडे, डॉ. शिरीष गोडे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर प्रवीण हिवरे, प्रमोद हिवाळे यांची उपस्थिती होती. आर्वीच्या सभेत अमर काळे तर देवळीच्या सभेत रणजीत कांबळे यांचे नाव लोकसभा उमेदवारीसाठी काहींनी घेतले.