|| महेश बोकडे
अवयवदानात अडचणी
शहरातील खासगी रुग्णालये ‘नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणून नोंदणी करीत नसल्याने अवयवदान प्रक्रियेत अडचणी येत आहे. नोंदणी नसलेल्या रुग्णालयातून मेंदूमृत रुग्णांचे अवयव प्रत्यारोपणासाठी घेता येत नाही, हे येथे उल्लेखनीय.
उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), सुपरस्पेशालिटी रुग्णालय, ट्रामा केयर सेंटर, डागा स्मृती महिला रुग्णालय या शासकीय रुग्णालयांसह सुमारे ७०० खासगी रुग्णालये असून त्यातील ५० रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागासह रुग्णांसाठी अनेक व्हेंटिलेटरचीही सोय आहे. या रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान रुग्ण मेंदूमृत होतो. मेंदूतील पेशी मृत झाल्यामुळे ते बरे होऊ शकत नाहीत. काही तासांत त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे वेळीच रुग्णाचे अवयव (मूत्रपिंड, यकृत, नेत्र यासह इतरही) गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. रुग्णांच्या अवयवदानाबाबत शासनाचे काही कायदे आहेत. त्यानुसार एनटीओआरसी केंद्र नोंदणी केलेल्या रुग्णालयांमध्येच अवयवदान करता येते. उपराजधानीतील मेडिकल, मेयो या रुग्णालयांनी एनटीओआरसीसाठी नोंद केली आहे, परंतु येथे वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे आतापर्यंत मेडिकलमध्ये तीन तर मेयोत फक्त एकाच मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान झाले.
काही खासगी रुग्णालयांकडून विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला मेंदूमृत रुग्ण मिळाले असले तरी त्यांना मेंदूमृत घोषित करण्यासह त्यांचे अवयव काढण्यासाठी, प्रत्यारोपणासाठी मंजूर केलेल्या केंद्रात हलवावे लागते. या प्रक्रियेत विलंब झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो.
तीन वर्षांत ४८ रुग्णांचे अवयवदान
मागील तीन वर्षांत ४८ मेंदूमृत रुग्णांच्या अवयवदानाचे प्रस्ताव विभागीय प्रत्यारोपण समितीकडे आले होते. त्यापैकी चार मेडिकल आणि मेयो या शासकीय रुग्णालयांतील होते. शहरात आजपर्यंत ३६ यकृत प्रत्यारोपण झाले आहेत. सर्वाधिक प्रत्यारोपण हे न्यू ईरा रुग्णालयात झाले आहेत.
मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानासाठी आता खासगी रुग्णालयेही प्रोत्साहित करत असल्याचे सुखद चित्र आहे, परंतु अतिदक्षता विभाग असलेल्या रुग्णालयांनी एनटीओआरसी केंद्र घेतल्यास अवयवदानाला अधिक गती येईल व गरजू रुग्णांचे अवयव प्रत्यारोपणाने प्राण वाचू शकतील. – डॉ. विभावरी दाणी, अध्यक्ष, विभागीय प्रत्यारोपण समिती, नागपूर.
अवयवदानाच्या चांगल्या कामासाठी सर्व खासगी रुग्णालये मदत करत असून पुढेही करत राहणार आहेत. परंतु एनटीओआरसी केंद्रासाठी स्वतंत्र व्हेंटिलेटर, खाटांसह इतर मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागतो. शासनाने विशेष अनुदानासह सवलती दिल्यास हे केंद्र घेण्यास डॉक्टर पुढाकार घेऊ शकतील. – डॉ. आशीष दिसावाल, अध्यक्ष, इंडियन मेडिकल, असोसिएशन, नागपूर.