लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यातील असंख्य महिला बचत गट पारंपरिक शेवया, पापड, कुरडई या व्यवसायात रमल्या असताना, काही स्वयंसहायता बचत गटांनी ग्राहकांच्या जीभेचे लाड पुरविण्यासाठी वेगळी वाट चोखाळली आहे. येथील समता मैदानात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियानांतर्गत सुरू असलेल्या समृद्धी मिनी सरस प्रदर्शनातील खेकडा कढी, बटेर हंडी, बटेर फ्राय, गावरानी चिकन हे ‘मेनू’ ग्राहकांना आकर्षित करत आहेत. रविवारी रात्री प्रदर्शनातील अशा मांसाहारी स्टॉलवर खवय्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

यवतमाळात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बचत गटांच्या सरस प्रदर्शनात अनेक स्टॉल लागले आहेत. काही महिला स्वयंसहायता गटांनी वेगळी वाट धुंडाळल्याचेही या प्रदर्शनात दिसले. पुसद येथील एका स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून चक्क पुस्तक विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे. काही गटांनी फळ, फूल, झाडांच्या विक्रीचा स्टॉल लावला आहे. मात्र सर्वाधिक गर्दी ही मांसाहारी खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर होत आहे.

आई एकविरा प्रभाग संघ आणि माँ अंबिका स्वयंसहायत संघ, हिवरा संगम (ता. महागाव) या संघाच्या अश्विनी धीरज ठाणेकर या महिलेने मैत्रिणींच्या मदतीने खेकडा कढी, बटेर हंडी, बटेर फ्राय विक्रीचा स्टॉल लावला. त्यांनी महागाव तालुक्यातील पोखरी येथे शेतात पतीच्या मदतीने बंदीस्त खेकडा आणि बटेर पालन सुरू केले. शेतात आठ फूट खोलीचे ३० बाय २० फुटांचे पाच टाके तयार केले. यात त्या खेकडा पालन करतात. तसेच शेतातच बटेर पालन करतात. महिन्याला किमान एक हजार बटेर पक्षी विक्री होतात. या व्यवसायातून वार्षिक दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न होत असल्याचे अश्विनी ठाणेकर यांनी सांगितले. बचत गटांच्या प्रदर्शनात स्टॉल लावण्यावर अधिक भर असल्याचे त्यांनी सांगितले. त्या स्वत: उमेदमध्ये पशु सखी म्हणून कार्यरत आहेत. या प्रदर्शनात त्यांना सोनाली कदम आणि वर्षा खापरकर या मैत्रिणी स्वयंपाकात तर पती धीरज हे स्टॉल सांभाळण्यासाठी मदत करत आहे. थंडीच्या दिवसांत काळ्या खेकड्याची कढी ही आरोग्यास उत्तम असल्याचे सांगण्यात येत असल्याने या स्टॉलवर दोन दिवसांपासून खेकडा कढी पिण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत आहे.

बचत गटांचे प्रदर्शन आणि ‘मांडे-मटण’ हे समीकरण पक्के आहे. या प्रदर्शनात जोडमोहा खटेश्वर (ता. कळंब) येथील सुजाता विलास मसराम यांच्या बिरसामुंडा स्वयंसहायता समुहाने प्रदर्शनात मांडे – मटण विक्रीचा स्टॉल लावला. मटण, मांडे, गावरानी चिकन आणि पुरणपोळी ही बिरसामुंडा बचत गटाची विशेषत: असल्याचे सुजात मसराम यांनी सांगितले. २० वर्षांपासून त्या हा बचत गट चालवित आहेत. त्यात पारंपरिक पापड, शेवया, कुरडई असेही पदार्थ विक्री करतात. मात्र ग्राहकांना मांसाहरी पदार्थ आवडत असल्याने मांडे-मटणकडे वळल्याचे त्यांनी सांगितले. माठावरील संपूर्ण मांडा ही बचत गटाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. खवय्यांना ऑर्डरप्रमाणे बनवाईसुद्धा देत असल्याचे त्या म्हणाल्या. या कामात त्यांना पती आणि मुलगी त्यांना सहकार्य करतात.

यवतमाळच्या सरस प्रदर्शनात फेर फटका मारल्यानंतर या प्रदर्शनाचा हेतू केवळ शासनाचे निर्देश असल्याने निधी खर्च करणे हेच असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मात्र प्रदर्शनातील ‘फूड झोन’ मधील १५-२० खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांच्या जिभेचे लाड पुरवले जात असल्याने येथेच बचत गटांना उत्पन्नाची हमी आहे.

Story img Loader