नागपूर : शाळांना परिक्षेनंतर उन्हाळी सुट्या लागतात, पण व्याघ्रप्रकल्पांना मात्र पावसाळी सुट्या लागतात. राज्यातील व्याघ्रपर्यटनाला सुट्या लागण्याचा काळ आता जवळ आला आहे, पण तरीही व्याघ्रप्रकल्पातील काही भागात पर्यटन सुरूच राहणार आहे. मात्र, उन्हाळा आणि हिवाळ्यात पर्यटनाचा जो आनंद मिळतो, तो पावसाळ्यात व्याघ्रप्रकल्पाच्या भागातील पर्यटनातून मिळत नाही. म्हणूनच की काय! सुट्या लागण्याचा काळ जसजसा जवळ येत आहे, तसतसे वन्यप्राणी देखील पर्यटकांना गोड आठवणी देऊन जात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील हा असाच एक प्रसंग.

एरवी सफारी म्हटले तर पर्यटक आणि विशेषकरुन छायाचित्रकारांचे सर्व लक्ष हे वाघांवरच केंद्रित असते. त्यामुळे इतर वन्यप्राण्यांच्या भावमुद्रा, त्यांच्या करामती दुर्लक्षित होतात. मात्र, अजूनही काही वन्यजीव छायाचित्रकार असे आहेत, ज्यांना वाघासह इतरही वन्यप्राण्यांच्या भावमुद्रा टिपण्याची तेवढीच आवड आहे. अमरावती येथील अप्पर आयुक्त गजेंद्र बावणे हे त्यातलेच एक व्यक्तीमत्त्व. लोकसत्ताला त्यांनी आजवर वाघांसह इतरही वन्यप्राण्यांची छायाचित्रे, चित्रफिती उपलब्ध करुन दिल्या आहेत. अलिकडेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात त्यांनी अस्वलाच्या अप्रतिम भावमुद्रा टिपल्या आहेत.

हेही वाचा – सातशे वारकरी, ५५ वर्षांची परंपरा; ‘श्रीं’च्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ताडोबा असो वा इतर व्याघ्रप्रकल्प किंवा अभयारण्य, उन्हाळ्यात हमखास पाणवठ्यात वाघ, वाघिणीसह बछडे, वाघाचे संपूर्ण कुटुंब दिसून येते. समाजमाध्यमावर त्यांच्या या चित्रफिती भरभरुन दिसून येतात. मात्र, गजेंद्र बावणे यांनी एका अस्वलाची टिपलेली चित्रफित आणि त्यातील अस्वलाच्या भावमुद्रा म्हणजे वाघालाही मात देणाऱ्या आहेत. मोसमी पाऊस हळूहळू राज्य व्यापू लागला आहे. विदर्भात मात्र अजूनही तापमानाचा पारा चढलेलाच आहे. काही भागात मोसमी पावसाचे आगमन झाले असले तरीही पूर्व विदर्भात उन्हाचा कडाका कायम आहे. या उन्हामुळे आणि उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. वातानुकूलीत यंत्रणेचा वापर करुन माणसे अंगाचा दाह शमवू शकतात, पण प्राण्यांना पाणवठ्यावाचून पर्याय नाही. म्हणूनच ते तासनतास पाणवठ्यात बसून दिसतात.

हेही वाचा – नागपूर जिल्ह्यात चामुंडा बारुद कंपनीत स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू, आठ ते दहा कामगार जखमी

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील या अस्वलाचेही असेच काही झाले. उकाडा त्याला सहन झाला नाही आणि अंगाची लाहीलाही होत असतानाच त्याने पाणवठ्याचा आधार घेतला. पाण्यात तो अक्षरश: संपूर्ण शरीर ओले करत पाणी उडवत होता. काय करु नी काय नको, म्हणजे अंगाचा दाह कमी होईल, अशीच त्याची भावमुद्रा होती. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात बांबूची रांजी मोठ्या प्रमाणात आहे आणि या रांजीनी वेढलेल्या पाणवठ्यातील पाणीही थंड होते. त्यामुळे या अस्वलानेही तासभराहून अधिक वेळ पाण्यातच मुक्काम ठोकला.