‘मेट्रो मॅन’ डॉ. ई.श्रीधरन यांचे मत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी सध्या त्याची गरज नाही. उलट, भारतीय रेल्वेला तंत्रज्ञान, प्रवाशांची सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या पातळीवर सक्षम करावे. कालांतराने बुलेट ट्रेनचा विचार करावा, असे मत ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांनी व्यक्त केले.
नागपूर मेट्रो रेल्वेच्या पहिल्या स्थापनादिन कार्यक्रमासाठी डॉ.श्रीधरन गुरुवारी नागपूर येथे आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात सध्या बुलेट ट्रेनची चर्चा जोरात आहे. महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद या मार्गे ती सुरू करण्यात येणार आहे. यावर कोटय़वधी रुपये खर्च येणार आहे. बुलेट ट्रेनच्या गरजेबाबत त्यांना छेडले असता सध्या बुलेट ट्रेनची गरज नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर मेट्रो रेल्वेच्या एकूणच कामाबाबत, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल श्रीधरन यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकार पाठबळ असणे आणि आर्थि क सहाय्यासोबतच अतिरिक्त एफएसआय, मुद्रांक शुल्कात माफी या सवलती सरकारने देणे, या बाबी या प्रकल्पाचे वेगळेपण आहे. चेन्नई, बंगळुरू व इतर प्रकल्पाला हे भाग्य नाही. त्यामुळे तेथे अडचणी येत आहेत. असे ते म्हणाले.
सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात नियोजनाबाबत ते म्हणाले की, केंद्र सरकारने एक धोरण तयार केले आहे. कोचीनमध्ये त्यानुसार काम सुरू असून तेथे काही प्रमाणात ताळमेळ दिसून येत आहे.

काय हवे?
बुलेट ट्रेनऐवजी रेल्वेची सुरक्षा, तांत्रिकदृष्टय़ा अद्यायवतीकरण आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधा या पातळीवर सक्षमीकरणाची गरज . रेल्वेची गती वाढलीच पाहिजे, पण सध्या भारतीय रेल्वेपुढे अनेक समस्या आहेत. अनेक ठिकाणी रेल्वेमार्ग नाहीत, कार्यक्षमता व तंत्रज्ञानाचा अभाव आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज. या गोष्टींकडे प्रथम लक्ष देणे गरजेचे. या गोष्टींची परिपूर्णता झाल्यानंतर पुढच्या आठ-दहा वर्षांत बुलेट ट्रेनचा विचार करता येईल.

रेल्वे सरकारनेच चालवावी
रेल्वेचे खाजगीकरण करण्यास श्रीधरन यांनी नापसंती दर्शविली. कंपन्या या सर्वप्रथम त्यांच्या नफ्याचा विचार करतात. सरकारला लोकांचा विचार करावा लागतो. त्यामुळे रेल्वे सरकारनेच चालवावी या मताचे आपण आहोत, असे ते म्हणाले.

Story img Loader