विदर्भातून यंदा पाचशे कोटी रुपयांची संत्री निर्यात झाली, पण त्यावर आपण समाधानी नाही. नाशिकमधील एका शेतकऱ्याने १५०० कोटींची द्राक्षे निर्यात केली आहेत. आपण त्यांच्या जवळपासदेखील नाही. त्यामुळे पुढील काळात आपल्याला ५ हजार कोटी रुपयांपर्यंतच्या निर्यातीचा टप्पा गाठावा लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

अपेडा आणि ॲग्रो व्हिजन फाऊंडेशनच्यावतीने येथील हॉटेल रंगोली पर्लच्या सभागृहात रविवारी सायंकाळी ‘विदर्भातील कृषी उत्पादने, फळे आणि भाजीपाला निर्यातीची संधी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण पोटे, अपेडाचे संचालक डॉ. तरुण बजाज, ॲग्रोव्हिजनचे रवी बोरटकर, महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे, प्रा. दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, आपल्या राज्यात फळे आणि भाजीपाला निर्यातीसाठी मोठा वाव आहे, पण त्यात अनेक अडचणी आहेत. संत्र्याच्या गुणवत्तापूर्ण कलमांचा अभाव आहे. फळे, भाजीपाल्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण अधिक आहे. संत्र्याची गुणवत्ता ही देखील समस्या आहे. संत्री बागांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, संत्र्याच्या पॅकेंजिंग, ग्रेडिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता आसाम आणि पूर्वेकडील राज्यांमध्येही संत्री उत्पादन होत आहे. स्पेनमधील संत्र्याची गुणवत्ता चांगली असल्याचे सांगितले जाते. आता तेथील संत्र्याच्या कलमा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
येणारा काळ हा ‘फ्लेक्स इंजिन’चा राहणार आहे. पेट्रोलऐवजी इथेनॉल मिश्रित इंधन हा पर्याय राहणार आहे. त्यावरील वैज्ञानिक आणि तांत्रिक पडताळणी झाली आहे. इथेनॉल हे पेट्रोलच्या अर्ध्या किमतीत उपलब्ध होऊ शकेल आणि देशांचा पैसा वाचेल, असे सांगतानाच अनेक वाहन कंपन्यांनी नव्या बदलांचा स्वीकार केला असून त्यादृष्टीने इंजिन निर्मितीदेखील सुरू केली आहे, असा दावा गडकरी यांनी केला.

…तर तुरुंगात टाकले जाईल
विदर्भात चांगल्या गुणवत्तेच्या संत्र्याच्या कलमा, रोपे मिळत नाहीत, ही शेतकऱ्यांची खंत आहे. आपल्याला स्वत: त्याचा फटका बसला आहे. चांगल्या प्रतीची रोपे मिळाल्यास दर्जेदार फळे उपलब्ध होऊ शकतील आणि संत्री मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकतील. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण संत्र्याची रोपे मिळाली पाहिजेत. चुकीची कामे करणाऱ्या लोकांनी या क्षेत्रात येऊच नये, नाहीतर त्यांना तुरुंगात टाकले जाईल, असा इशारा गडकरी यांनी दिला.