डॉ. गिरीश गांधी यांचा फडणवीसांना सल्ला
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांची पवार यांच्याशी अतिशय जवळची मैत्री होती याचे स्मरण ठेवावे, असा सल्ला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांनी फडणवीस यांना दिला.
गिरीश गांधी हे ‘लोकसत्ता’शी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विटच्या माध्यमातून पवार यांच्यावर टीका केली होती. यासंदर्भात बोलताना गिरीश गांधी म्हणाले, टीकेला उत्तर देता येईल. परंतु एकच सांगतो की, फडणवीस यांचे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस आणि शरद पवार यांची मैत्री पक्षातित होती. शिवाय फडणवीस यांच्या आमदार म्हणून सुरुवातीच्या काळात ते शरद पवार यांचे कौतुक करायचे, असे मला आठवते.
पवार हे माझ्याबद्दल फार चांगले बोलतात, माझे प्रश्न समजून घेतात, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. कधी नव्हे तो महाराष्ट्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एकत्रित येण्याची शक्यता मला वाटते. परंतु जे सत्तेपासून वंचित राहिले, त्यांना दु:ख होणे स्वाभाविक आहे. पवार यांच्यावर आरोप होण्यामागेही त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसाठी बजावलेली महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता आहे, याकडेही गांधी यांनी आवर्जून लक्ष वेधले.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पवार यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. मागील ५५ वर्षांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पवार कार्यरत आहेत. त्यांचे राजकीय जीवन अनेक वर्षांपासून जवळून पाहण्याची संधी मला मिळाली.
अलीकडे त्यांच्यावर काही व्यक्तींनी जी वैयक्तिक टीका केली ती मात्र क्लेशदायी आहे. पवार यांना जातीयवादी म्हणणे हे अयोग्य आहे. अनेक जातीतील व विविध धर्मातील कार्यकर्त्यांना त्यांना योग्य ती संधी दिली आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेकांना वेळोवेळी मदत केली आहे.
सच्चर समितीचा अहवाल सर्वानी मान्य केला होता. मुस्लीम समाजात मोठय़ा प्रमाणावर दारिद्रय़ आणि अंधश्रद्धा आहे. ते गेल्याशिवाय त्यांना मुख्य प्रवाहात आणता येणे शक्य नाही. मुस्लीम या देशाचे नागरिक आहेत, असे माझे मत आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबतच्या फडणवीस यांच्या टीकेबाबत ते म्हणाले, एखाद्या चित्रपटाबद्दल वेगळी मते असू शकतात. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एखादा विषय एखाद्याला भावला म्हणून दुसऱ्याला भावलाचा पाहिजे असे काही नाही, असेही गांधी म्हणाले.
बॉम्बस्फोटानंतरची परिस्थिती पवारांनीच आटोक्यात आणली
१९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा संदर्भ देऊन फडणवीस यांनी केलेला आरोप निखालस खोटा आहे. बॉम्बस्फोटानंतरची परिस्थिती आटोक्यात आणण्याचे सर्व श्रेय हे शरद पवारांना आहे. त्यांच्याकडून राजकारणात काही चुका झाल्या असतील, यासंदर्भातील आरोप समजण्यासारखे आहेत. पण शरद पवार हे देशद्रोही आहेत हे मला कधीही मान्य नाही, असेही गांधी म्हणाले.
जातीय तेढ निर्माण होऊ दिली नाही
कोणताही काँग्रेसचा कार्यकर्ता मुळात धर्मनिरपेक्ष असतो. गांधी, नेहरू आणि विनोबा यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून तो कार्य करतो. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होऊ दिले नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची कास काँग्रेसने सातत्याने धरलेली आहे, असे गांधी म्हणाले.