अमरावती : महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी संभाजी भिडे यांना राजापेठ पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्या नोटीसमधून त्यांना दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्याची सूचना करण्यात आली आहे. तो तपासाचा भाग असला तरी ती नोटीस भिडे यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली.
हेही वाचा – VIDEO : ताडोबा प्रकल्पात झाडातून बाहेर पडलेल्या पाण्याने वनकर्मचारी भागवितात तहान!
हेही वाचा – भंडारा : मासे पकडायला जाणे जीवावर बेतले, एकाचा मृत्यू
दरम्यान, भिडे यांच्याविरुद्ध ज्या वक्तव्यापोटी गुन्हा दाखल झाला, त्या वक्तव्याची ध्वनिफीत न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. २७ जुलै रोजी सायंकाळी संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करून व लोकांमध्ये असंतोष पसरवून विविध समाज घटकांमध्ये वाद वाढविण्याचे भाष्य केले. तथा महापुरुषांची बदनामी केली, अशी तक्रार राजापेठचे अंमलदार मंगेश शिंदे यांनी २९ जुलै रोजी पहाटे ३ च्या सुमारास नोंदविली होती. त्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे (रा. सांगली), निशांतसिंह जोध, अविनाश मरकल्ले व इतरांविरुद्ध कलम १५३ अ (वर्गांवर्गांमध्ये शत्रुत्व वाढविणे), ५०० (मानहानी), ५०५ (२) (अफवा किंवा द्वेष भडकविणे) या कलमांद्वारे गुन्हा दाखल केला होता.