कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतील एका वरिष्ठ सुरक्षा रक्षकाने पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा विभागात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सुरक्षा रक्षकाला नोटीस काढली आहे.
सुरेश पवार असे वरिष्ठ सुरक्षकाचे नाव आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते व पालिका कर्मचारी रमेश पौळकर यांनी या बेकायदा बांधकाम प्रकरणी आय प्रभागात तक्रार केल्याने त्याची दखल घेण्यात आली आहे. एकीकडे पालिका आयुक्त अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देत असताना, पालिकेतील एका ज्येष्ठ सुरक्षा रक्षकाने अनधिकृत बांधकाम केल्याने खळबळ उडाली आहे. चाळीच्या बांधकामावर पहिला माळा बांधण्यास मज्जाव आहे. तरीही या बांधकामाला कोणत्याही प्रकारची पालिकेची परवानगी न घेता पवार यांनी अशाप्रकारचे बेकायदा बांधकाम केल्याचे तक्रारदार पौळकर यांनी सांगितले. आपण कल्याण डोंबिवली पालिकेच्या आस्थापनावरील कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्याने अनधिकृत बांधकाम करणे कायद्याने फौजदारी गुन्हा आहे. तरीही आपण अशाप्रकारचे बांधकाम केले आहे. त्यामुळे या बांधकाम प्रकरणी शुक्रवारी जमिनीची मालकी हक्काची कागदपत्र, अकृषिक परवानगी, मोजणी नकाशा, पालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीची प्रत आणि अन्य इतर कागदपत्रे घेऊन सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी दिले आहेत.
हेही वाचा – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील रस्ते वाहन कोंडीच्या विळख्यात
गेल्या वर्षभरात कल्याण पूर्व भागातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पुढाकार घेतला आहे. राजकीय दबाव न मानता त्या कारवाई करत असल्याने राजकीय मंडळीही त्यांना वचकून आहेत. सुरक्षा रक्षक पवार यांच्या बांधकामासंबंधी त्या काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कल्याण पूर्वेतील एका लोकप्रतिनिधीचा निवडणुकीत प्रचार केला म्हणून पालिकेने पवार यांच्यावर यापूर्वी वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे, असे पौळकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी वरिष्ठ सुरक्षा रक्षक सुरेश पवार यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत कामगारांकडून चोरी
“वरिष्ठ सुरक्षा रक्षक सुरेश पवार यांनी चिंचपाडा येथे अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या अनुशंगाने त्यांना कागदपत्र दाखल करण्याची नोटीस बजावली आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आयुक्तांच्या आदेशावरून योग्य कारवाई केली जाईल.” – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.