अमरावती : मारहाण, हत्येचा प्रयत्न, खंडणीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या अकोला येथील एका गुंडाचा भाजपामध्ये प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्याला मीडिया सेलची जबाबदारी, यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे. भाजपामधील या घडामोडींची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
अकोल्यातील भाजपा कार्यालयात अजय ऊर्फ अज्जू ठाकूर याचा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच प्रवेश झाला. अज्जू ठाकूर हा अकोल्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. अज्जू ठाकूर याच्या नावावर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये मारहाण, हत्येचा प्रयत्न, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. एप्रिल २०२० मध्ये अज्जू ठाकूर याच्या टोळीने धोतर्डी गावात पोलीस असल्याचे सांगून गावकऱ्यांना मारहाण केली होती. अनेक गावांत आपली दहशत पसरवली होती. या टोळीतील अज्जू ठाकूरसह चारजणांवर तेव्हा बोरगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्याला भरचौकात पोलिसांकडून ‘पाहूणचार’देखील देण्यात आला होता. आमदारांच्या उपस्थितीतच त्याचा भाजपामध्ये जंगी प्रवेश सोहोळा पार पडल्याने पश्चिम विदर्भात हा चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपा ‘वॉशिंग मशिन’ असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. यातच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या पक्षप्रवेशाने त्या चर्चेला बळ मिळाले आहे.
हेही वाचा – अकोलेकरांवर भर पावसाळ्यात जलसंकट; जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे…
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निखिल भामरे याची भाजपाच्या मीडिया सेलच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने गेल्यावर्षी शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. निखिल भामरे याच्यावर राज्यभरात ७ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच त्याला अटकही करण्यात आली होती. भाजपाने त्याच्यावर समाजमाध्यमे हाताळण्याची जबाबदारी सोपविल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा – अकोला: पैसे खर्च झाले अन् युवकाने रचला जबरी चोरीचा बनाव; पोलीस तपासात फुटले बिंग
अज्जू ठाकूरला प्राथमिक सदस्यत्व दिलेले नाही – आमदार रणधीर सावरकर
अजय ऊर्फ अज्जू ठाकूर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला ठाऊक नव्हती. अज्जू ठाकूर हा इतर ४० ते ५० लोकांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होता. पक्ष कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागतच केले जाते. भाजपाने अज्जू ठाकूर याच्या पत्नीला पक्षात प्रवेश दिला आहे. त्याला अजून प्राथमिक सदस्यही केलेले नाही. प्रसार माध्यमांवरील चर्चेनंतर आपण त्याच्याविषयी अधिक माहिती घेत आहोत. त्यात तथ्य आढळून आल्यास, यावर निर्णय घेतला जाईल. पक्षात गुन्हेगारी वृत्तीला स्थान नाही, असे भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.