महेश बोकडे
नागपूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ऊर्जा खात्यातील वीज कामगारांच्या प्रश्नावर चर्चेसाठी वारंवार वेळ मागत आहे. परंतु त्यांना वेळ मिळत नसल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने १ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे.
ऊर्जा खात्याच्या अखत्यारितील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी वीज कामगार गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत. दुसरीकडे या कंपन्यांमध्ये रिक्त पदे असतानाही त्यांना कायम केले जात नाही. डिसेंबर २०२२ मध्ये या कंत्राटी कामगारांना अतिरिक्त गुण देऊन सेवेवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु फारसा लाभ झाला नाही.
हेही वाचा >>>अत्याचार पीडित बालिकेचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईच्या महिला डॉक्टरला अटक
ओडिशा, राजस्थान, पंजाब सरकारने तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीत घेतले आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही निर्णय घ्यावा किंवा रानडे समितीच्या अहवालानुसार वीज कंपन्यांतील नियमित रिक्त पदांवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाच्या ६० वर्षांपर्यंत शाश्वत रोजगार द्यावा. कंत्राटदाराच्या मध्यस्थीऐवजी कंपनीने थेट कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे. त्याबाबत ऊर्जा खात्यासह संबंधित कंपन्यांना नोटीसही देण्यात आली आहे.
हे सरकार कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासाठी वेळ देत नाही. त्यामुळे कंत्राटी कामगार नाराज आहेत. त्यामुळे १ नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. – नीलेश खरात, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ.