नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पातील पेंच नदीच्या पात्रात मगर आणि कासवांच्या घनता आणि निवासस्थानाच्या वापराचा अभ्यास करण्यात येत आहे. नागरी विज्ञान उपक्रमाचा वापर करून करण्यात येणारे हे भारतातील पहिलेच निरीक्षण सर्वेक्षण आहे.
कोलितमारा पर्यटन परिसरापासून दोन जूनला या सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून चार जूनपर्यंत ते असेल. हे सर्वेक्षण तीनसा इकोलॉजिकल फाउंडेशनच्या सहकार्याने केले जात आहे. या सर्वेक्षणात ३० हून अधिक मगर सर्वेक्षण करणारे तज्ज्ञ, संशोधक सहभागी होतील. हर्पेटोलॉजी, मगर, कासव सर्वेक्षणाचा पूर्वीचा अनुभव असलेले स्वयंसेवक या सर्वेक्षणात सहभागी होऊ शकतात.
पेंच नदी, लोअर पेंच धरण आणि तोतलाडोह जलाशयाच्या उतारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामुळे व्यवस्थापनाला संपूर्ण व्याघ्र प्रकल्पाचे एकाच वेळी तपासणी करता येईल. जंगलात मगरी आणि कासवांच्या निवासस्थानाच्या वापराच्या वैज्ञानिक दस्तऐवजीकरणावर काम करण्याचा हेतू आहे. सध्याच्या सर्वेक्षणामुळे व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीच्या अधिवासामधील विविध भागात मगरी आणि विविध कासवांच्या प्रजातींचे विपुलता आणि वितरणाचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
अर्जदारांनी १५ मे पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत गुगल अर्ज भरायचा आहे. याकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. निवडलेल्या सहभागींना इमेलद्वारे कळवले जाईल. सहभागींना निवडलेल्या सर्वेक्षण क्षेत्राजवळ निवडलेल्या संरक्षण कुटींपैकी एकाचे वाटप केले जाईल. प्रत्येक संरक्षण कुटीवर, किमान एका तज्ञ, संशोधकाच्या नेतृत्वाखाली एक किंवा दोन व्यक्ती राहतील. त्यांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाकडून केली जाईल.
हेही वाचा – चंद्रपूर : प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराची आत्महत्या
सर्वेक्षणामध्ये किनाऱ्याच्या बाजूने पायी चालत असताना व बोटद्वारे माहिती अहवाल आणि सर्वेक्षण करणे समाविष्ट आहे. अधिक माहितीसाठी पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा.