नागपूर : राज्यात वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राचे नवीन ‘स्मार्ट कार्ड’ १ जुलैपासून मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी परिवहन खात्याने कर्नाटकातील कंपनीशी करार केला आहे. नवीन ‘स्मार्ट कार्ड’वर ‘लेझर प्रिंट’ असल्याने जुन्या स्मार्ट कार्डवरील माहिती पुसट वा अस्पष्ट होण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
स्मार्ट कार्ड निर्मितीबाबत हैदराबादमधील रोझमार्टा कंपनीसोबत परिवहन विभागाचा करार झाला होता. हा करार नुकताच संपुष्टात आला. त्यामुळे परिवहन खात्याने कर्नाटकातील ‘द एमसीटी कार्ड ॲन्ड टेक्नोलाॅजी प्रा. लि.’ या कंपनीसोबत करार केला. नवीन ‘स्मार्ट कार्ड’ची निर्मिती ‘पाॅली कार्बोनेट’ या महागड्या घटकांपासून होणार आहे. त्यावर रेघोट्याही कमी पडतात. खिशात ठेवल्यावर त्यावरील शाई मिटत नाही.
नवीन ‘पाॅली कार्बोनेट’पासून तयार ‘स्मार्ट कार्ड’वर ‘लेझर प्रिंट’ असेल. पूर्वीच्या पाॅली विनाइल क्लोराइटपासून (पीव्हीसी) निर्मित कार्डवरील शाई घर्षणाने मिटत होती. परंतु नवीन कार्डवरील प्रिंट दीर्घकाळ ठळकपणे दिसत राहील. दरम्यान, जुन्या कंपनीसोबत करार संपुष्टात आल्याने सध्या ‘स्मार्ट कार्ड’चा तुटवडा आहे. त्यामुळे नागरिकांना विलंबाने म्हणजे एक ते दोन महिन्यांनी ‘स्मार्ट कार्ड’ मिळत आहेत. नवीन कार्डचा पुरवठा १ जुलैपासून होण्याचे संकेत आहेत.
पुणे, मुंबई, नागपुरातच ‘प्रिंटिंग’
राज्यात पुणे, मुंबई व नागपूर या तीनच शहरात केंद्रीकृत पद्धतीने परिवहन खात्याने करार केलेल्या कंपनीकडून अद्ययावत ‘स्मार्ट कार्ड’ची ‘प्रिंटिंग’ होणार आहे. या कार्यालयातून इतरत्र ‘स्मार्ट कार्ड’ पाठवले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
नवीन ‘स्मार्टकार्ड’ जागतिक दर्जाचे असून ते दीर्घकाळ टिकणार आहे. १ जुलैपासून हा उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न असून रोज सुमारे ४५ हजार ‘स्मार्टकार्ड’ नागपूर, पुणे, मुंबई केंद्रातून परिवहन खात्याला मिळतील. – विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.