नागपूर: बांग्लादेश सीमेवरून कोलकातामार्गे सोन्याची तस्करी करणाऱ्या नागपुरातील एका व्यापाऱ्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर पकडले. त्याच्याकडून पाच कोटी रूपये किंमतीचे ८.५ किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणाची डीआरआयच्या पथकाने सखोल चौकशी केली. आता हे प्रकरण मुंबई मुख्यालयाकडे सोपविण्यात आले आहे. या तस्करीचे तार कुठपर्यंत जुळले आहेत आणि यात आणखी किती व्यापाऱ्यांचा समावेश आहे याची सखोल चौकशी सुरू आहे.
महसूल गुप्तचर संचालनालय आणि आरपीएफच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर संयुक्त कारवाई केली होती. डीआरआयच्या चौकशीत एक सराफा व्यापारी आणि त्याचा कर्मचारी असे दोघांची नावे समोर आले होते. नागपुरातील सराफा व्यापारी आणि त्याचा कर्मचारी या दोघांनीही बांग्लादेश सिमेवरून सोन्याची तस्करी केली. गाडी क्रमांक १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेसने (एस-४) नागपुरला आले. नागपूर रेल्वे स्थानकावर उतरताच डीआरआय आणि आरपीएफने संयुक्त कारवाई करीत दोघांनाही पकडले. कार्यालयात त्यांची एक दिवस सखोल चौकशी केली. नंतर हे प्रकरण डीआरआय मुंबई कार्यालयाकडे सोपविण्यात आले.
हेही वाचा… प्रेयसी आणि प्रियकर शौचालयात भेटले, कुटुंबीय उठले अन् प्रियकराला धु… धु… धुतले
संपूर्ण मुद्देमाल आणि कागदपत्रांसह दोघांनाही मुख्य कार्यालयाकडे सोपविण्यात आले. गेल्या १३ दिवसांपासून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तस्कराचे जवळपासच्या सराफा व्यापाऱ्याशी संबध असून त्यांच्याकडून ऑर्डरनूसार आकर्षक आणि विविध डिझाईनचे दागिने तयार करण्याचे काम घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चोरट्या मार्गाने सोने भारतात
सोन्याची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ दुबईला आहे. नियमानुसार शासनाचा कर भरून बिस्किट स्वरूपात सोने आणले जाते. त्यानंतर कारागिरांकडून ऑर्डरनुसार आकर्षक आणि विविध डिझाईनचे दागिने तयार केले जातात. दिवाळीला दागिण्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. त्यासाठी बाजारपेठा सजल्या आहते. हीच संधी साधून तस्कर दुबईतून चोरट्या मार्गाने सोने भारतात आणतात. विदेशातून तस्करीच्या सोन्याची बांग्लादेश सीमेवरुन कोलकाता मार्गे वाहतूक होत असल्याचे तपासान निष्पन्न झाले.