लोकसत्ता टीम
वर्धा : विशेष मागास प्रवर्गातील गरजूंनासुध्दा घरकूल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून भाजप नेते सुमित वानखेडे यांचा पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. इतर समाजासाठी विविध घरकूल योजना आहे. मात्र विशेष मागास प्रवर्ग (एसबीएससी) या वर्गातील गरजूंसाठी एकही घरकूल योजना नव्हती. त्यामुळे शासकीय स्तरावर त्यांना घरकूलांचा लाभ देता येत नव्हता. ही बाब समाजाच्या काहींनी भाजप नेते सुमित वानखेडे यांच्या निदर्शनास आणून दिली.
यातील गोवारी समाजासह या वर्गाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. मात्र लाभ देण्याबाबत अध्यादेश नव्हता. ही बाब वानखेडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार अध्यादेशात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. अखेर २७ सप्टेंबरला इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यातर्फे लाभ देण्याचा आदेश निघाला. इतर मागास प्रवर्गासोबतच विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांचा समावेश पंतप्रधान घरकूल योजनेत करण्यास मान्यता मिळाली. राज्य शासनाच्या माध्यमातून या समाजाला आता न्याय मिळेल, असा विश्वास सुमित वानखेडे यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा-अबब… तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ, बघा व्हिडीओ
याचा लाभ सर्वप्रथम वर्धा जिल्ह्यातील गोवारी समाजाच्या १८०० कुटुंबांना मिळणार आहे. या निमित्त्याने आर्वी, आष्टी व कारंजा येथील गोवारी समाज बांधवांनी वानखेडे यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलतांना म्हणाले की हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. समाजात काम करतांना काही गोष्टी शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून द्याव्या लागतात. तेच काम आपण केले. पंतप्रधान घरकूल योजना तसेच जलजीवन मिशन यात गोवारी बांधवांना आता लाभ मिळेल. हा समाज अद्याप कुडाच्याच घरात राहतो. त्यांना आता पक्के घर मिळेल. गणपती बाप्पा पावला, असे वानखेडे म्हणाले. अशोक विजेकर, बाळा नांदुरकर, कमलाकर निंबोरकर, प्रशांत वानखेडे, सचिन होले, जयंता जाने, विजय गाखरे, अश्विन शेंडे, पुलाबाई नेहारे, कमला नेहारे, रमेश नागोसे आदींनी सत्कार केला.