नाटय़संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वींचा सवाल
रवींद्र पाथरे, कै. राम गणेश गडकरी नाटय़नगरी (नागपूर)
‘हल्ली कुणीही उठतो आणि लेखक-कलावंतांना वेठीस धरतो. त्यांच्या तोंडाला काळे फासले जाते. मारण्याची धमकी दिली जाते. ठारही केले जाते. पण या गुन्ह्य़ाबद्दल शिक्षा मात्र कुणालाच होत नाही. उलट हे गुंड मोकाट फिरत असतात. त्यांच्या भीतीने लेखक-कलावंतांनी सृजनाविष्कार करायचे सोडून आता स्वत:च्या संरक्षणासाठी विचारस्वातंत्र्य सेना काढावी काय?’ असा जळजळीत सवाल ९९व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला.
जिथे विचारांची निर्मिती मरते तो समाज मरतो नि ते राष्ट्रही मरते. विरोधी विचार म्हणजे समाजाच्या सुखासाठीचे मार्गदर्शन असते. हे मार्गदर्शन सतत होत राहिले पाहिजे, तरच समाजाच्या सुखासाठी योग्य ते काम करता येईल, अशी सकारात्मकताही त्यांनी व्यक्त केली.
नाटय़संमेलनाध्यक्ष गज्वी यांनी आपल्या दीर्घ भाषणात विविध मुद्दय़ांना स्पर्श करत त्याबाबतची आपली मते रसिकांसमोर मांडली. जातनिहाय आरक्षणापासून कलावंतांच्या विवंचनांपर्यंत, तसेच पावणेदोनशे वर्षांच्या मराठी रंगभूमीच्या वाटचालीत बुद्धिवादी प्रेक्षक घडविण्यात रंगभूमीला आलेल्या अपयशापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले.
महात्मा गांधींची हत्या, इंदिरा गांधींचा खून, गोध्राकांड, भीमा कोरेगाव दंगल प्रकरण तसेच कथित गोमांस सापडल्याचे निमित्त करून दादरीत घेतला गेलेला बळी आदींचा उल्लेख करून गज्वी यांनी देशात पसरवल्या जाणाऱ्या दहशतीला वाचा फोडली. भय दाखवले की भीतीने माणसे गोठून जातात. आणीबाणीच्या काळात हाच अनुभव आला आणि बाबरी मशीद पाडली तेव्हाही. आता तर नवेच भय पेरले जाते आहे.. शहरी नक्षलवाद! मी शहरात राहतो नि माझ्याजवळ नक्षली विचारांचे साधे पत्रक जरीोापडले तरी मला शहरी नक्षलवादी ठरवले जाईल. असे हे आमचे राज्यकत्रे! ज्यांना आम्हीच निवडून दिले आहे. ही आमचीच माणसे; पण कळत नाही प्रजेशी अशी का वागतात ती!
नाटय़संमेलनांच्या ९९ वर्षांच्या इतिहासात अनेक महत्त्वाची नावे संमेलनाध्यक्षपदापासून दूर का राहिली, असा प्रश्न उपस्थित करून गज्वी म्हणाले की, विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, गो. पु. देशपांडे, डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, पं. सत्यदेव दुबे, अमोल पालेकर असे अनेक रंगकर्मी संमेलनाध्यक्ष होऊ शकले नाहीत.
हा प्रायोगिक रंगभूमी विरुद्ध व्यावसायिक रंगभूमी असा सुप्त संघर्ष म्हणायचा की आपल्या एकूणच खुज्या आकलनाचा परिणाम? संमेलनाचा अध्यक्ष तोच होऊ शकतो- जो नाटय़ परिषदेचा सदस्य आहे; पण असे नामवंत नाटय़कर्मी परिषदेचे सदस्य का होत नाहीत, याचाही अंतर्मुख होऊन विचार होणे गरजेचे आहे.
प्रतिभासंपन्न लेखक-कलावंतांना उत्तमोत्तम कलानिर्मितीसाठी शासन व समाजाने दैनंदिन आर्थिक विवंचनांतून मुक्त करून मनोमोकळेपणाने अभिव्यक्त होण्याकरिता वातावरण निर्माण करून दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संगीत रंगभूमीच्या काळापासूनच नाटय़कलेने लोकप्रिय होण्याचा हव्यास न धरता प्रेक्षकांना कलाप्रिय करण्याचा ध्यास धरायला हवा होता. परंतु प्रत्यक्षात मात्र घडले वेगळेच. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या नादात बुद्धिवादी प्रेक्षक आपणच तयार करायचा असतो, हे आपण विसरून गेलो, असे निरीक्षण नोंदवून गज्वी पुढे म्हणाले की, असे काही प्रयत्न अनेकांकडून झालेही; परंतु व्यावसायिक रंगभूमीने या प्रायोगिक प्रयत्नांना गिळून टाकले, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध अशा अन्य समाजांतील मराठी भाषिक रंगकर्मीना नाटय़संमेलनात का स्थान मिळू नये, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठी रंगभूमीसमोरच्या अनेक समस्यांचे गज्वी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात साधार विवेचन केले.
राज्यकर्ते कधीच सहिष्णू नव्हते – एलकुंचवार
आपले राज्यकर्ते कधीच सहिष्णू नव्हते. आज नाटय़धर्मी शब्द वापरताना भीती वाटते. सफदर हाश्मीचा मुडदा पडला, सॅटेनिक व्हर्सेसवर बंदी आली, घाशीराम कोतवाल वादात सापडले. ही असहिष्णुताच होती, असे सडेतोड प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी संमेलनाचे उद्घाटक या नात्याने केले. नयनतारांसारखे मला शेवटच्या क्षणी कुणी येऊ नका, असे म्हणाले नाही म्हणून मी उद्घाटक म्हणून येथे बोलू शकत आहे. यवतमाळच्या साहित्य संमेलनानंतर उद्घाटक म्हटले की दचकायला होते. मी नाखुषीनेच इथे आलो आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमादरम्यान प्रकृती बरी वाटत नसल्याने एलकुंचवार यांना रुग्णालयात नेण्यात आले.