वर्धा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा पाजण्याची व ढाब्यावर जेवू घालण्याची सूचना नगरमध्ये पक्षसभेत बोलताना केली. त्याचे संतप्त पडसाद आता पत्रकार वर्तुळात उमटत आहे.
येथील विविध पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी थेट आवाहनच करून टाकले. बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आता चहाला येण्याचे आवाहन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. प्रातिनिधिक कार्यक्रम २८ सप्टेंबरला सावंगी टी पॉइंट येथील कॅन्टीनवर सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा – पाऊसमान : पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा, पुढील ७२ तासांत…
चहा व ढाबा संस्कृतीवर प्रेम असणाऱ्या भाजपा नेत्यांनी आवर्जून हजेरी लावावी, असे लेखी आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे. यानंतर लगेचच जेवणपण देण्यात येणार असल्याचे सूचित आहे. तसेच तालुका व गाव पातळीवर काम करणाऱ्या वार्ताहर बंधूंनी भाजपाच्या गाव पुढाऱ्यांना चहासाठी निमंत्रित करीत बावनकुळे यांच्या संदेशाचा प्रसार करावा, असे सुचविण्यात आले आहे.