आता पोलीस ठाण्यातूनही कारवाई

मंगेश राऊत, नागपूर</strong>

वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी स्वतंत्र विभाग आहे. तरीही सर्रास नियमभंग केला जातोच, यावर आळा घालण्यासाठी आता वाहतूक पोलिसांसोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचारीही यापुढे वाहन चालकांचे चालान फाडताना दिसतील.

शहरात मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये शहरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अशावेळी वाहतूक नियंत्रित करण्यात वाहतूक पोलीस व्यस्त असताना वाहन चालक नियमांचे उल्लंघन करतात. सोनसाखळी चोर, वाहन चोरांना पकडण्यासाठी पोलीस ठाण्यांतर्गत दररोज नाकाबंदी करण्यात येते. या दरम्यान पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांपासून एकाच वाहनावर तीनजण जाणे, नाकाबंदी बघून पळून जाणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवून पोलिसांना प्रकार होतात. पण, चालान पुस्तिका नसल्याने पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी काहीच करू शकत नाही. शेवटी त्यांना वाहतूक पोलिसांवर अवलंबून राहावे लागते. शिवाय वाहतूक पोलिसांशी संपर्क साधल्यास ते आपले काम सोडून येतात व पोहोचायला किमान अर्धा ते एक तास लागतो. एका चालान कारवाईसाठी इतका वेळ प्रतीक्षा करणे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना  प्रत्येक वेळा शक्य होत नाही. त्यामुळे नाकाबंदी दरम्यान पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चालान पुस्तिका वाटण्यात आल्या आहेत. आता वाहतूक पोलिसांव्यतिरिक्त पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारीही चालान कारवाई करताना दिसतील.

मद्यपींवर कारवाईसाठी प्रयत्न

नवीन वर्ष काळात लोक मोठय़ा प्रमाणात मद्य प्राशन करून वाहन चालवतात व अपघातांचेही प्रमाण वाढते. त्यामुळे मद्यपींवर चालान कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला दोन चालान पुस्तिका देण्यात आल्या आहेत. त्यांना केवळ मद्यपींवरील कारवाईसाठी प्राधान्य देण्यास सांगण्यात आले. ही व्यवस्था १ जानेवारीपर्यंतच आहे. भविष्यात ती नियमित करायची किंवा नाही, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

      – राजतिलक रोशन, उपायुक्त, वाहतूक शाखा, नागपूर

Story img Loader