अमरावती : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक दर्जाचे ३ हजार ६५२ कॅमेरे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हिडीओ सर्व्हिलन्स) बसविण्याचा निर्णय घेतला असून भुसावळ विभागातील सर्वच मेल, एक्स्प्रेसचे थांबे असलेल्या ७० रेल्वे स्थानकांवर ही व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या सुरक्षा प्रकल्पासाठी निर्भया निधी वापरण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ३६४ रेल्वे स्थानकांवर चेहरा ओळखणाऱ्या ३,६५२ कॅमेऱ्यासह ६,१२२ सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ‘रेलटेल’च्या माध्यमाने मोफत वायफाय स्थानकात उपलब्ध आहे. ऑप्टिकल फायबरच्या माध्यमाने सीसीटीव्हीची जोडणी स्थानिक रेल्वे सुरक्षा कक्ष, विभागीय कक्ष आणि केंद्रीय कक्ष अशा ठिकाणी देण्यात येणार आहे. त्रिस्तरीय सुरक्षेमुळे रेल्वे स्थानकांसह प्रवाशांची सुरक्षा वाढणार आहे.
हेही वाचा – पाऊसमान : पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा, पुढील ७२ तासांत…
हेही वाचा – वर्धा : आता गावागावात भाजपा नेत्यांसाठी पत्रकारांतर्फे चहापान व एकदा जेवण
प्लॅटफॉर्मसाठी बुलेट प्रकार, इनडोअर भागांसाठी डोम प्रकार, संवेदनशील ठिकाणांसाठी ‘अल्ट्रा एचडी ४ के कॅमेरे आणि पार्किंग क्षेत्रासाठी पॅन-टिल्ट-झूम यामधून थेट प्रसारण रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर दाखवले जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा मुख्य उद्देश हा रेल्वे स्थानकातील गुन्हेगारांवर वचक ठेवणे हा आहे. गर्दीत चेहरे ओळखणारे कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पकडण्यास मदत होणार आहे.