वर्धा: आयुष्यात एकदा जरी नापास म्हणून शेरा मिळाला की त्या विद्यार्थ्यास ‘ ढ ‘ म्हणून चिडवल्या जाण्याचा अनुभव अनेकांना आला असेल. पण एकदा नापास म्हणजे अनुत्तीर्ण झाले की संपले असे होत नसल्याचे पुढे घवघवीत यश घेत अनेकांनी दाखवून दिले आहे. पण बारावीत नापास झाले की, पुढचा पदवी प्रवेश टप्पा थांबतो, हे सुध्दा खरेच. मात्र यापुढे तसे होणार नाही.

विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युजीसीने यासंदर्भात नवे निर्देश दिले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुण पत्रिकेत तसा उल्लेख राहणार नाही. म्हणजे पुन:परीक्षा असा उल्लेख होणार नाही. युजीसीने २०२५ नियमावली अंतर्गत तसे स्पष्ट केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार हा बदल राजपत्र अधिसूचना काढीत जाहीर झाला. पदवीपूर्व व पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यासाठी किमान मानक आहेत. ती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता दोन वर्षाचा प्रवेश, बहुप्रवेश निर्गमन व पदवी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ वाढवण्यात आला आहे.

पुढील सत्रपासून बारावी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्या शाखेत प्रवेश घेऊ शकतील. कला, विज्ञान तसेच वाणिज्य शाखेत पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीत संबंधित विषय उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार नाही. दिलासा असा की सत्र २०२५ – २६ पासून एक किंवा दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुण पत्रिकेत पुन्हा परीक्षेस बसण्याचा उल्लेख केला जाणार नाही. (देअर विल बी नो मेन्शन ऑफ री अपिअरिंग इन द स्टुडंट्स मार्कशीट).

पुढील वर्षांपासून हे लागू होणार. विद्यार्थी संबंधित विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेस बसू शकतील. तसेच त्यांच्या गुणवत्तेनुसार पसंतीचा प्राध्यापक निवडू शकतील. २०२५ या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेणारे विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठास पदवी पूर्ण करण्याची मुदत स्वतः निवडण्याचा पर्याय विचारण्यास मोकळे आहेत. पहिल्या व दुसऱ्या सत्रातील मूल्यांकनाच्या आधारावर हा पर्याय मिळणार. १० टक्के जागा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. शिवाय तीन वर्षाची चार वर्षात किंवा चार वर्षाची पदवी पाच वर्षात पूर्ण करण्याची सोय आहे. आजवर विद्यार्थी दोन किंवा तीन विषयात नापास झाला तर त्याच्या गुण पत्रिकेत पुन्हा परीक्षेस बसावे लागणार, असा उल्लेख असायचा. पण हा डाग आता उमटणार नाही.