नागपूर जिल्ह्य़ात काम सुरू ल्ल दोन कोटींचा खर्च अपेक्षित
प्रचंड गाजावाजा करीत सुरू केलेली आधार नोंदणी सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक नसल्याचा निर्वाळा दिल्याने आता अशाच प्रकारच्या ‘एनपीआर’ (नॅशनल पापुलेशन रजिस्टर) पद्धतीचा अवलंब केला जाणार असून त्यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली आहे. टप्प्या टप्प्याने आधार हे ‘एनपीआर’मध्ये विलीन केले जाण्याची शक्यता असून यावर जिल्ह्य़ात दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारित येत असलेल्या जनगणना संचालनालयाचे एक पत्र गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यात ‘एनपीआर’साठी राष्ट्रीयस्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून घरोघरी जावून एनपीआरची नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. नोंदणीसाठी लागणाऱ्या ‘किट्स’ तयार करून जिल्हा प्रशासनाने प्राथमिक स्वरूपाच्या कामाला सुरुवात केली आहे. आधार कार्ड सारखेच ‘एनपीआर’चे स्वरूप आहे. त्यात नाव, असेल तर मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डचा क्रमांक टाकावा लागणार आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, पण त्यांनी नोंदणी केली आहे. त्यांनी त्या पावतीचा क्रमांक एनपीआर किट्समध्ये नोंदवायचा आहे. नोव्हेंबर महिन्या अखेपर्यंत नोंदणीचे काम सुरू राहणार असून यासाठी शिक्षक व महसूल कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. बिगरशैक्षणिक कामासाठी शिक्षकांची मदत घेऊ नये, असे आदेश असतानाही या कामासाठी त्यांना गुंतवण्यात येत असल्याने शिक्षकांमध्येही नाराजी आहे.
आधार आणि एनपीआर यात विशेष फरक नाही. तत्कालीन केंद्र सरकारने २०१० मध्ये जगणनेचे काम सुरू करतानाच एनपीआरचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंदन निलकनी यांनी यासाठी आधार कार्डचा पर्याय पुढे केला. या मुद्दावर तेंव्हाच्या सरकारमध्ये मतभेदही निर्माण झाले होते. काही राज्यात ही मोहीम सुरूही करण्यात आली होती. नागपूर जिल्ह्य़ातही यासंदर्भात हिगंणा तालुक्यात शिबीर घेण्यात आले होते. नंतर आधार सक्तीचे म्हणून सर्वत्र नोंदणी सुरू झाल्याने एनपीआरचे काम थांबले होते. मधल्या काळात केंद्र सरकारने आधार क्रमांक इतरही योजनांसाठी सक्तीचा केल्याने सर्वच नागरिकांनी त्यासाठी रांगा लावल्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आधार ऐच्छिक असून बंधनकारक नाही, असे निर्देश दिल्यावर आधार सक्तीच्या आदेशातील हवाच निघाली. त्याचवेळी केंद्र सरकारने पुन्हा आपला मोर्चा ‘एनपीआर’कडे वळविला आहे. देशात आतापर्यंत ८८ कोटी नागरिकांनी आधारसाठी नोंदणी केली असून नागपूर जिल्ह्य़ात हे प्रमाण ९० टक्क्यांवर आहे हे येथे उल्लेखनीय. ‘एनपीआर’ नोंदणी केली जात असली तरी आधारचे काम सुरूच आहे.