लोकसत्ता टीम

बुलढाणा : शेगाव तालुक्यातील गावातील केस गळती आणि टक्कलग्रस्त रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत आज दुप्पट झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. या विचित्र आणि अनामिक आजाराची रुग्ण संख्या शंभरवर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनामिक आजाराने अकरा गावात शिरकाव केल्याचे चित्र आहे. काल संध्याकाळी रुग्ण संख्या ५१ होती, नंतर ती ६८ झाली होती. दरम्यान, आज शेगाव तालुक्यातील अन्य गावात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ती आज संध्याकाळ पर्यंत शंभर पर्यंत पोहोचली आहे. आज, गुरुवारी जवळा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गतच्या तरोडा कसबा गावात दहा रुग्ण आढळून आले आहे. जलंब केंद्र अंतर्गतच्या माटरगाव आठ, पहूरजिरा बारा, नींबी पाच रुग्ण आढळून आले. आज अखेर अकरा गावात शंभर रुग्ण आढळून आले आहे. यामुळे बाधित रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आणखी वाचा-नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…

पाण्यात नायत्रेटचे प्रमाण जास्त

यापैकी काही गावातील पाण्याचे नमुने जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल आरोग्य विभागास प्राप्त झाला आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या पाण्यात नायत्रेटचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण एक लिटर पाण्यात दहा मिलिग्राम असायला हवे, मात्र ते प्रमाण चौपन्न मिलिग्राम असल्याचे आढळून आले आहे. तसेच क्षाराचे (टिडीस) प्रमाण एकवीसशे निघाले असून सामान्य स्थितीत ते केवळ एकशे दहा इतके असायला पाहिजे, असे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यावर कळस म्हणजे या पाण्यात घातक असे आरसेनिक व लीड आढळून आले आहे. याची तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader