लोकसत्ता टीम

नागपूर : सर्व साधारणपणे सतेत असलेल्या पक्षात इतर पक्षाचे नेते प्रवेश करतात. दोन वर्षाचा अपवाद सोडला तर २०१४ पासून भाजप सत्तेत आहे. २०१४ ते २०१९ या दरम्यान भाजपमध्ये इनकमिंग सुरू होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाला. नागपुरात मात्र भाजपचा उमेदवार जिंकला. मात्र इतर पक्षातून काँग्रेसमध्ये येणऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: पश्चिम नागपूरमध्ये हे चित्र आहे.

पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम नागपूरमधील विविध राजकीय पक्षांचे नेते आता काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. २ सप्टेंबर २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शैलेश पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विकास ठाकरे आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी पांडे यांचे काँग्रेस परिवारात स्वागत केले. शैलेश पांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनापूर्वी पश्चिम नागपूर विभागाचे अध्यक्ष होते. त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने समर्थक देखील काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. पांडे आणि त्यांच्या समर्थकांच्या या काँग्रेस प्रवेशामुळे पश्चिम नागपूरमधील काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी मिळेल.

आणखी वाचा-नागपूर : चतुर्थश्रेणी कर्मचारी पदभरतीच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ; उमेदवार परीक्षेला मुकले

गेल्या पाच वर्षांत पश्चिम नागपूरचा सर्वाधिक विकास झाला. ठाकरे यांनी पश्चिम नागपूरमधील नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पश्चिम नागपूरमधील अधिकाधिक नागरिक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते ठाकरे यांच्या सोबत जोडले जात आहेत.

काही दिवसांपूर्वीच, पश्चिम नागपूरचे दोनदा नगरसेवक राहिलेले डॉ. प्रशांत चोप्रा यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी, पश्चिम नागपूरमधील आणखी काही भाजपा नेतेही काँग्रेसमध्ये सामील झाले होते. काही महिन्यांपूर्वी, आम आदमी पक्षाच्या पश्चिम नागपूर विभागाचे अध्यक्ष अभिजीत झा यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आणखी वाचा-विलोभनीय कडी असलेला शनी ग्रह ८ सप्‍टेंबरला पृथ्वीजवळ, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्‍य

नागपूर शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यापैकी दोन जागा काँग्रेसकडे आणि चार ठिकाणी भाजप विजयी झाले आहेत. भाजपचा जोर आहे. भाजप वरिष्ठ नेत्यांचे नागपूर हे गृहशहर आहे. मात्र इतर पक्षाचे नेते भाजपला टाळून काँग्रेसकडे जाण्याचा कल वाढतोय असे चित्र आहे.