लोकसत्ता टीम

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून निवडणूकीत चुरस वाढली आहे. भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ‘आयाराम’ची संख्या वाढली आहे.

मागील आठवड्यात वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक असलेले काँग्रेसचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसमध्ये अन्याय होत असल्याची टिका करीत नागपूरात मुनगंटीवार यांच्यासक्षम भाजपामध्ये प्रवेश केला. तर, शिवसेनेच्या (उबाटा) गटाच्या महिला प्रमुख उज्वला नलगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मंगळवारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष यांनी मुनगंटीवार यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला. पाऊणकर हे धनोजे कुणबी समाजाचे असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाने जातीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी वाचा-“नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाने आशीर्वाद दिला”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

त्यांच्यासोबत माजी अध्यक्ष विजय बाल्की, मारेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमण डोहे, संतोष मत्ते, सविता माशिरकर आदींनी प्रवेश घेतला. गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू, श्री. कन्यका नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्राचार्य विजयराव आईंचवार, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण पोटदुखे यांनी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना, मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणूकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या ‘आयाराम’ची संख्या वाढल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

Story img Loader