लोकसत्ता टीम
नागपूर : भारतात आढळणाऱ्या ‘स्नो लेपर्ड’चा पहिला वैज्ञानिक अहवाल जाहीर झाला असून भारतात सद्या:स्थितीत या प्रजातीचे ७१८ प्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे देशातील निम्म्यापेक्षा जास्त, ४७७ स्नो लेपर्ड एकट्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत.
‘स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम’(एसपीएआय) हा अहवाल मंगळवारी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांनी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत केला. या अहवालानुसार भारतात ७१८ स्नो लेपर्ड असल्याचे स्पष्ट झाले आहे. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने या अभ्यासात मुख्य भूमिका वठवली. स्नो लेपर्ड असणारी राज्ये तसेच म्हैसूर येथील नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन ही संस्था व डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया यांचा या अभ्यासात सहभाग होता.
आणखी वाचा-केंद्र-राज्यांच्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत विसंगती
‘स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम’ने देशातील स्नो लेपर्डच्या ७० टक्केपेक्षा जास्त श्रेणींचा अभ्यासात समावेश केला. लडाखखालोखाल उत्तराखंडमध्ये १२४, हिमाचल प्रदेशात ५१, अरुणाचल प्रदेशात ३६, सिक्कीममध्ये २१ व जम्मू काश्मीरमध्ये ९ स्नो लेपर्ड आढळून आले आहेत. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात हिम बिबट्यांच्या अवकाशीय वितरणाचे मूल्यांकन, वेगवेगळे अधिवास, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाद्वारे संख्येच्या मूल्यांकनाच्या मार्गदर्शक तत्त्वांशी संरेखित करण्याची बाब समाविष्ट आहे. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेमध्ये ‘स्नो लेपर्ड कक्ष’ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आणखी वाचा-नागपूर : खासदर औद्योगिक महोत्सवातील स्वच्छतागृहात महिलांचे आक्षेपार्ह चलचित्र, कला शिक्षकाने…
सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये
हिमालयाच्या प्रदेशात आढळून येणाऱ्या ‘स्नो लेपर्ड’चा भारतामध्ये प्रथमच शास्त्रीय अभ्यास करण्यात आला आहे. यामुळे बर्फातील या सर्वात घातक शिकाऱ्याची नेमकी स्थिती स्पष्ट झाली असून संवर्धनासाठी उपाय योजणे शक्य होणार आहे.
- स्नो लेपर्डच्या अधिवासाचा २०१९ ते २०२३ या काळात अभ्यास
- त्यांची चिन्हे शोधण्यासाठी १३ हजार ४५० पायवाटांचे सर्वेक्षण
- एक हजार ९७१ ठिकाणी सुमारे एक लाख ८० हजार कॅमेराट्रॅप
- एकूण २४१ ठिकाणी छायाचित्रण