लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यात सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या १ लाख ४० हजार ८०८ रूफ टॉप सोलर संचापैकी सर्वाधिक २४ हजार ३५७ संच नागपूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे नागपूरने सौर ऊर्जा निर्मितीत राज्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
घराच्या छपरावर सौरऊर्जा पॅनेल्समधून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि अतिरिक्त वीज महावितरणला द्यायची, अशी ही योजना आहे. सध्या राज्यात या संचाची संख्या १ लाख ४० हजार ८०८ वर पोहचली आहे. त्यामुळे वीज निर्मितीची स्थापित क्षमता २ हजार ५३ मेगावॉट इतकी झाली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात २४ हजार ३५७ रूफ टॉप असून त्यांची विद्युत निर्मिती स्थापित क्षमता २५१ मेगावॉट आहे. नागपूर परिमंडळाचा विचार करता वर्धा जिल्ह्यातील २ हजार ६५३ रुफ टॉपसह परिमंडळातील एकूण २७ हजार १० जणांनी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती सुरू केली आहे. राज्यातील एकूण सोलर रुफ टॉपमध्ये नागपूर परिमंडळाचा वाटा १९.१८ टक्के आहे.
आणखी वाचा-धक्कादायक! राज्यात चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत चौपट वाढ
सात वर्षांपूर्वी केवळ १ हजार सोलर रुफ टॉप
सात वर्षांपूर्वी महाराष्ट्रात केवळ १ हजार ७४ रुफ टॉप होते. त्यातून २० मेगावॉट सौरऊर्जा रूफ निर्माण होत होती. सात वर्षांत त्यात मोठी वाढ होऊन ही संख्या १ लाख ३० हजार ८०८ वर गेली. मागील वर्षी ही संख्या ७६ हजार ८०८ होती. एकट्या नागपूर जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात तब्बल १० हजार ९४ ठिकाणी ८२ मेगावॅट स्थापित वीजनिर्मिती करणाऱ्या रुफ टॉप संच लावण्यात आले.
सौर पॅनेलमधून निर्मित वीज वापरानंतरही उरल्यास ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते. त्यामुळे या ग्राहकांना बऱ्याचदा शून्य रकमेचे वीज देयक येते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो. -दिलीप दोडके, मुख्य अभियंता, महावितरण, नागपूर परिमंडळ.