|| चंद्रशेखर बोबडे
प्रवेश तिकीट विक्रीत २५ कोटींची घसरण
नागपूर : करोनामुळे दोन वर्षांत राज्यातील केंद्रीय संरक्षित स्मारकांना भेटी देणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने या स्मारकांच्या प्रवेश तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात २५ कोटींची घट झाली आहे तर दुसरीकडे स्मारकांच्या सुरक्षेवरचा खर्च वाढला आहे.\
\राज्यात एकूण २८६ केंद्रीय संरक्षित स्थळे आहेत. त्यापैकी २० अधिक प्रसिद्ध आहेत. २०१९-२० मध्ये या स्थळांना प्रवेश तिकीट विक्रीपासून एकूण २८ कोटी ७७ लाख ७० हजार ३३७ रुपये महसूल प्राप्त झाला होता. २०२०-२१ मध्ये त्यात घट होत तो ३ कोटी २० लाख ५ हजार २४१ रुपयांपर्यंत कमी झाला. दुसरीकडे विविध स्थळांच्या सुरक्षेसाठी २०१९-२० मध्ये ५ कोटी १२ लाख २९ हजार ४०५ रुपये खर्च झाला होता. त्यात २०२०-२१ मध्ये वाढ होऊन तो १० कोटी ६० लाखांवर गेल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडून प्राप्त झाली.
२०१९-२० मध्ये अजिंठा लेण्यांना प्रवेश तिकिटातून २ कोटी ६ लाख, ३९ हजार रुपये प्राप्त झाले होते. २०२०-२१ मध्ये ही संख्या १८.८२ लाखापर्यंत खाली आली. एलोरा लेणींना २०१९-२० मध्ये प्रवेश शुल्कापासून ६.२९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते २०२०-२१ मध्ये ६२.७६ लाखापर्यंत खाली आले. पुण्याच्या सुप्रसिद्ध शनिवार वाडय़ाला २०१९-२० मध्ये ३. ४ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. २०२०-२१ मध्ये केवळ ३९.६४लाख रुपये मिळाले. नागपूर जिल्ह्यातील मनसर येथील प्राचीन बौद्धकालीन स्तुप शिलालेख प्रसिद्ध आहे. २०१९-२० मध्ये या संरक्षित स्थळाला प्रवेश तिकिटातून ५९ हजार ४०० रुपये मिळाले होते. २०२०१ मध्ये ही रक्कम फक्त १६० रुपये होती. यावरून पर्यटकांची संख्या किती कमी झाली याची प्रचिती येते.
दुसरीकडे उत्पन्न कमी झाले असले तरी स्थळांच्या सुरक्षेसाठी खर्च मात्र वाढला आहे. अजंता गुफेवर २०१९ मध्ये १.३९ कोटी तर २०२०-२१ मध्ये १.४७ कोटी खर्च आला. मनसरमध्ये ५.०२ लाखावरून तो २१.१४ लाखापर्यंत वाढला. इतर स्मारकांच्या बाबतही हीच स्थिती आहे. करोना काळाचा फटका स्मारकांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येला बसला, प्रतिबंध असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. याशिवाय पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक दिवस सर्व प्रमुख पर्यटनस्थळे बंद होती. त्याचा परिणाम महसुलावर झाल्याचे अधिकारी सांगतात.
करोनामुळे दोन वर्षांत पर्यटन उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. आता मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाल्याने शासनाने निर्बंध कमी करावे. त्यामुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडतील व या उद्योगालाही चालना मिळेल. – चंद्रपाल चौकसे, पर्यटन उद्योजक, नागपूर.