अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेनंतर (सिनेट) आता व्यवस्थापन परिषदेवरही ‘नुटा’ या संघटनेने वर्चस्व प्रस्थापित केले असून व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ‘नुटा’चे उमेदवार विजयी झाले आहेत. चार जागांवर ‘नुटा’चे उमेदवार यापुर्वीच अविरोध निवडून आले आहेत.
मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ‘नुटा’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघूवंशी, अविनाश बोर्डे व प्राचार्य राधेशाम सिकची हे निवडून आले. नोव्हेंबरमध्ये सिनेटची निवडणूक झाल्यानंतर मंगळवारी पहीली सभा पार पडली. या विशेष सभेत व्यवस्थापन परिषदेवर सिनेटमधून निवडून द्यावयाच्या तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. प्राचार्य संवर्गातून सिपना अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजय खेरडे व अकोला येथील सीताबाई कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राधेशाम सिकची यांच्यात लढत झाली. यामध्ये डॉ. राधेशाम सिकची ३९ मते प्राप्त करून विजयी झाले. प्राचार्य खेरडे यांना २९ मते मिळाली.
हेही वाचा >>> गोंदिया : ‘देशभरात दलितांवरील अत्याचारात वाढ’ ; राष्ट्रपतींना २१ मागण्यांचे निवेदन सादर
शिक्षक संवर्गातून ‘नुटा’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघूवंशी ४२ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी मेहकर येथील डॉ. संतोष कुटे यांचा पराभव केला. पदवीधरामधील एका जागेसाठी ‘नुटा’च्या अविनाश बोर्डे यांनी अभाविपचे अमोल ठाकरे यांचा पराभव केला. बोर्डे यांना ४३ मते मिळाली. या निवडणुकीत शिक्षण मंच-अभाविपला धक्का बसला आहे.
व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेतून आठ सदस्य निवडून द्यायचे असतात. चार सदस्य यापुर्वीच अविरोध निवडून आले. त्यात प्राचार्य डॉ. विजय नागरे, प्रा.हरीदास धुर्वे, भैय्यासाहेब मेटकर, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचा समावेश आहे. अनुसुचित जमाती संवर्गातील प्राचार्याची एक जागा पात्रते अभावी रिक्त आहे. त्यामुळे सात सदस्यांसाठीच्या या परिषदेवर ‘नुटा’चे सर्व सातही सदस्य निवडून आल्याने वर्चस्व स्थापित झाले आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर : ‘बांबू लेडी’ मीनाक्षी वाळकेला लंडनचा पुरस्कार; ‘आयआयडब्ल्यू शी इन्स्पायर्स अवॉर्ड’ने होणार इंग्लंडमध्ये सन्मान
विविध अधिकार मंडळांसाठी निवड विद्या परिषदेवर डॉ अशोक चव्हाण निवडून आले. त्यांना ५६ व प्रतिस्पर्धी डॉ. मिनल गावंडे यांना ८ मते मिळाली. डॉ मिनल गावंडे यांनी माघार घेतली होती, मात्र वेळ निघून गेल्याने त्यांचे नाव रिंगणात कायम होते. स्थायी समितीसाठी झालेल्या निवडणुकीत प्राचार्य संवर्गातून डॉ.डी.आर गावंडे, शिक्षक संवर्गातून डॉ. एस.पी.गावंडे, पदवीधरमधून एन.आर.टाले हे निवडून आले. विद्यार्थी विकास निधी समितीवर डॉ. व्ही.आर कापसे यांची इश्वर चिठ्टीने निवड करण्यात आली. त्यांना व डॉ.एस.टी कुटे यांना समान ३२ मते मिळाली. शिक्षक कल्याण समितीवर शिक्षक संवर्गातून डॉ. पी.व्ही विघे व प्राचार्य संवर्गातून डॉ.एन.एन. गावंडे निवडून आले.