वर्धा : शालेय पोषण योजना देशपातळीवार राबवल्या जाते. अनेक त्रुटी दूर करीत योजना चालू आहे. त्यात तक्रारी असतात आणि पोषण मूल्य जपण्याची ताकीद पण असते. आता नव्याने बदल करण्यात आला आहे. या केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आहार दिल्या जातो. त्यात पहिली ते पाचवीच्या प्राथमिक विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक व १२ ग्राम प्रथिनेयुक्त तर त्यापुढील वर्गासाठी ७०० उष्मांक व २० ग्राम प्रथिनेयुक्त आहार देण्याची तरतूद आहे. प्रामुख्याने तांदुळापासून बनलेल्या पाक कृतीचा लाभ दिल्या जात आहे. मात्र आहारात विविधता आणण्यासाठी तीन संरचनीय आहार पुरस्कृत करण्याचे ठरविल्या गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तांदूळ, डाळी, कडधान्ये यापासून तयार आहार, मोड आलेले कडधान्ये व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व देण्याचे ११ जून २०२४ मध्ये ठरले. पण योजनेत अडचणी दिसून आल्यात. याबाबत लोकप्रतिनिधी, नागरी संस्था, बचत गट, स्वयंपाकी संघटना यांनी निवेदने दिलीत. या अडचणी दूर करण्यासाठी आता नव्या १२ पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्हेज पुलाव, मसाले भात, मटर पुलाव, मुगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मूग शेवगा वरण भात, मटकी उसळ, अंडा पुलाव व गोड खिचडी किंवा नाचणी सत्व. असा आहार निश्चित झाला आहे. अनुक्रमे एक ते दहा पाककृती वेगवेगळ्या दिवशी द्याव्यात. प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ असावे. अंडा पुलाव व गोड पदार्थ या पर्यायी स्वरुपात आहेत. केंद्र शासनाने योजनेत लोक सहभाग वाढविण्याची सूचना केली आहे. त्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकण्यात आली आहे. गोड व अन्य पाककृतीसाठी आवश्यक असणारी साखर लोक सहभागातून देण्याचा प्रयत्न करावा. साखरेसाठी शासनाकडून कोणतेही अतिरिक्त अनुदान मिळणार नसल्याचे शालेय शिक्षण खात्याने २८ जानेवारीच्या निर्णयाने स्पष्ट केले आहे.

पाककृतीतील खाद्यपदार्थ हे एका विद्यार्थ्यास एका दिवसासाठी केंद्राच्या तरतुदीनुसार निश्चित केले आहे. विद्यार्थ्यास वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळावा अश्या या पाककृती आहेत. म्हणून प्रत्येक दिवशी कोणती पाककृती द्यायची, ही बाब जिल्हा परिषद समिती घेणार. महानगरपालिका क्षेत्रात वरिष्ठ समिती निर्णय घेणार असून त्यानुसारच आहार द्यावा लागणार. प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे म्हणतात हे चुकीचेच आहे. प्रथम गोड खीर ठरली होती. ती रद्द केली. आता लोकांना साखर मागून गोड खिचडी देण्याचे फर्मान आहे. शेवटी शिक्षकांनाच हे जुळवावे लागणार. लोकांना काय काय मागायचे हा मोठा प्रश्नच आहे, असा टोला कोंबे यांनी हाणला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nutrition diet maharashtra school sweet food student diet pmd 64 ssb