चंद्रपूर : मराठ्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावाल तर हे आंदोलन संपूर्ण राज्यात व विदर्भात देखील होईल, संपूर्ण ओबीसी समाज हा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेच्या पाठिशी उभा आहे, याची दखल सरकारने घ्यावीच, असे मत विदर्भवादी ओबीसी नेते व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी आज (दि.२०) ला येथे मांडले.
आम्ही दिलेल्या व्याखेप्रमाणे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. ५७ लाख नोंदीचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा आणावा. हैदराबादचे गॅझेट आपल्या राज्यातही लागू करावे. सातारा संस्थानचं गॅझेट लागू करावे, मनोज जरांगे यांच्या या मागण्यांच्या विरोधात विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, समस्त ओबीसी समाज व ओबीसी संघटना या ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल असा राज्य सरकारचा कोणताही निर्णय खपवून घेणार नाही.
हेही वाचा…अमरावतीत ‘जलजीवन मिशन’च्या कामांची संथगती; ६६६ मंजूर योजनांपैकी किती पूर्ण झाल्या? जाणून घ्या…
दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके व प्रकाश शेंडगे यांच्या आंदोलनाला देखील डॉ. अशोक जीवतोडे यांनी दुजोरा दिला आहे. ‘सगेसोयरे’ वर ओबीसींचा आक्षेप आहे, ओबीसी विरोधातील उमेदवाराला विधानसभेत त्याची जागा दाखवू, असेही डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्ष ओबीसी समाजा सोबत असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविले, त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा विश्वास असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले. मात्र जरांगेच्या आंदोलनाच्या दबावात येऊन जर राज्य सरकार सगे सोयरेचा अध्यादेश काढत असेल तर ओबीसी संघटना व समाज गप्प बसणार नाही. मोठ्या प्रमाणात राज्यात ओबीसीचे आंदोलन होईल व राज्यात बिघडणारी कायदा व सुव्यवस्थेस राज्य सरकार स्वतः जबाबदार असेल.
हेही वाचा…अकोला :‘मविआ’मुळेच हवाईसेवेच्या ‘टेकऑफ’ला ‘ब्रेक’, खासदार अनुप धोत्रेंचा आरोप
मराठा समाजाला जे काय आरक्षण द्यायचे आहे ते देत बसावे, मात्र भारतीय संविधान अभ्यासून निर्णय घ्यावा. ओबीसींच्या संवैधानीक अधिकारात घुसखोरी होऊ नये. दबावाच्या राजकारणाला बळी पडू नये. वारंवार ओबीसीला गृहीत धरू नये, अन्यथा खबरदार असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.