लोकसत्ता टीम
नागपूर : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून यंदा दरवर्षीपेक्षा दहा दिवस अगोदर परीक्षा होणार असल्याने शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नियोजन बिघडणार असून सराव परीक्षा आणि अभ्यासक्रमावरही याचा परिणाम पडणार असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आणखी वाचा-महायुतीच्या समन्वय बैठकीचे रवी राणांना निमंत्रण नाही, हे आहे कारण
शाळा-कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्याचे शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे. मात्र, दहा दिवसांआधी परीक्षा होणार असल्याने शिक्षक संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांवर यामुळे प्रचंड तणाव येणार असल्याने परीक्षा दरवर्षीच्या तारखांनुसारच घ्याव्या अशी मागणी केली जात आहे.
असे आहेत आक्षेप
- शिक्षक संघटनांच्या आक्षेपानुसार, दहा दिवस अगोदर परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दहा दिवस कमी मिळणार आहेत.
- निश्चितच यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होणार आहे.
- त्याचप्रमाणे सर्वच विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना दहा दिवस कमी मिळत असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर त्याचा परिणाम होणार आहे.
- ज्या शाळांमध्ये सराव परीक्षा घेतल्या जातात त्यांचे नियोजन बिघडणार आहे.
- ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान विधानसभेच्या निवडणुका होणार आहे.
- या कामात अनेक शिक्षक गुंतलेले असतात. यामुळे याचा फटकाही अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर होणार आहे.
- विधानसभेच्या निवडणुकांनंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याचे संकेत आहेत.
- त्यामुळे शिक्षक यात गुंतणार असल्याने शिक्षण मंडळाने या सर्व बाबींचा विचार करावा अशी मागणी केली जात आहे.
आणखी वाचा- मुलाने घर हिसकावून घेतले, आता कुठे जाणार? वृद्ध महिला पोहचली थेट विभागीय आयुक्तांकडे
राज्य शिक्षण मंडळाने परीक्षा घेण्यात यंदा घाई केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता संभाव्य वेळापत्रकात बदल करावा. यामुळे सर्वांनाच न्याय मिळेल. -प्रा.सपन नेहरोत्रा, विभागीय कार्यवाह, शिक्षक भारती.
राज्य मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. कुठल्या संघटनांना आक्षेप असल्यास त्यांनी सूचना पाठवाव्या. त्यांचा सकारात्मक विचार केला जाईल. -शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ.