पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रिया-२०२१ साठी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र, आता यातील अटींवर आक्षेप घेण्यात आला आहे. महिलांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करता २०२० मध्ये त्यांच्यासाठीच्या ‘लांब उडी’ची अट रद्द करण्यात आली होती. पोलीस भरतीमध्येही लांब उडी बंद आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने २०२३मध्ये होणाऱ्या शारीरिक चाचणीमधील लांब उडीची अट रद्द करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रिया २०२१ मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणीकरिता २०२३ मध्ये निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने शारीरिक चाचणीमध्ये महिला उमेदवारांना ४०० मीटर धावण्यासाठी १.१५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. तोच वेळ इतर राज्यात १.३० मिनिटे ते २ मिनिटे आहे. सदर प्रक्रियेत पुरुषांकरिता ८०० मीटरसाठी २.३० मिनिटे देण्यात आली आहेत.
पुरुषांना देण्यात आलेला २.३० मिनिटांच्या वेळेच्या तुलनेत महिलांना १.१५ मिनिटे देण्यात आली आहेत. परंतु, पुरुष आणि महिला यांची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्याचबरोबर भरती प्रक्रियेत यावर्षी लावण्यात आलेली ४ मीटर लांब उडीची अट अत्यंत जाचक आहे. यापूर्वी २०२० मध्ये ‘लांब उडी’ची अट रद्द करण्यात आली होती. मात्र, यावेळेस ती परत घालण्यात आली आहे. महिलांची शारीरिक क्षमता व मासिक पाळीचा त्रास लक्षात घेत लांब उडीमुळे दुखापत होऊ शकते.
हीच बाब लक्षात घेऊन पोलीस भरती तसेच विभागीय पोलीस उपनिरीक्षक प्रक्रियेत महिला परीक्षार्थीकरिता लांब उडीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. सदर प्रक्रियेत विवाहित महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बरेच महिला उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत १.१५ मिनिटाच्या वेळेत बदल करून १.३० मिनिट करण्यात यावे, तसेच लांब उडीची प्रक्रिया रद्द करून २०१९ प्रमाणे शारीरिक चाचणीचे निकष पूर्ववत ग्राह्य धरून भरती प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मानव अधिकार संरक्षण मंचने तसे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
धावण्यासाठी देण्यात आलेला अत्यल्प वेळ तसेच लांब उडीची जाचक प्रक्रिया अन्यायकारक आहे. यामुळे शारीरिक चाचणीसाठी निवड झालेल्या बऱ्याच महिला उमेदवारांचे नुकसान होईल. शासनाने याची गंभीर दखल घेत लांब उडीची प्रक्रिया रद्द करून धावण्यासाठीचा वेळ वाढवून द्यावा.- आशीष फुलझेले, मानव अधिकार संरक्षण मंच.