लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात १३ जुलैच्या रात्री एका महिला डॉक्टरच्या आंघोळीची चित्रफीत बनवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरला अखेर अटक करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सहा सदस्यीय समितीने आरोपी डॉक्टरवर हे कृत्य केल्याचा ठपका ठेवत तसा अहवाल अधिष्ठात्यांना सादर केला.

डॉ. दर्शन अग्रवाल (२८) असे आरोपीचे नाव आहे. १३ जुलैच्या रात्री मेडिकलमध्ये पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षाला शिकणारी महिला निवासी डॉक्टर मार्ड वसतिगृहात आंघोळीला गेली असताना डॉ. अग्रवालने मोबाईलद्वारे तिची चित्रफीत तयार करण्याचा प्रयत्न केला होता. महिला डॉक्टरने या प्रकरणाची माहिती अधिष्ठाता कार्यालयात तक्रार दिली.

आणखी वाचा-भानामती? बाहुलीवर हळदकुंकू अन् आपोआप कपडे पेटले; नेमके काय झाले, वाचा…

अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, उपअधिष्ठाता डॉ. उदय नारलेवार, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. गौर, डॉ. मनीष ठाकरे, डॉ. जयेश मुखी यांची सहा सदस्यीय समिती गठीत केली. समितीने शनिवारी डॉ. अग्रवालवर ठपका ठेवत अधिष्ठात्यांना अहवाल सादर केला. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण खात्याला सादर होणार असून त्यानंतर संबंधित डॉक्टरवर शिक्षेचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात विशाखा समितीकडूनही चौकशीची चाचपणी सुरू आहे. शुक्रवारी रात्री महिला डॉक्टरने अजनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी डॉ. अग्रवालला अटक केली. आरोपीला न्यायालयातून जामीन मंजूर झाल्याने त्याची सुटका झाली.

आरोपी म्हणतो, नेटवर्क तपासायला गेलो…

मोबाईल नेटवर्क नसल्याने मी नेटवर्क तपासण्यासाठी स्वच्छतागृहाकडे गेलो होतो, असा दावा डॉ. अग्रवाल याने चौकशी समितीपुढे केला. त्यावर समितीने त्याला नेटवर्क तपासण्यासाठी वसतिगृहाच्या बाहेर का गेले नाही, असा प्रतिप्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर देता आले नसल्याची सूत्रांची माहिती आहे.