अमरावती : बनावट कागदपत्रे जोडून जन्म दाखले मिळवण्याचे प्रकार आता अमरावती शहरातही उघडकीस आले असून नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आज एका महिलेसह सहा जणांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांनी जन्म प्रमाणपत्रे मिळवल्याचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीच्या आधारे ठिकठिकाणी पडताळणी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये (टीसी) खोडातोड आणि बनावट दस्तावेज सादर करून जन्म दाखला मिळवल्याच्या आरोपाखाली शहरातील सहा जणांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरिफ रहमान खान (रा. चपराशीपुरा), रहीम खान नियामत खान (बडनेरा), सैय्यद युसूफ अली सैय्यद कादर (मोमीनपुरा, बडनेरा), मोहम्मद निझामुद्दिन मोहम्मद हनीफ मुल्ला (बडनेरा), जमील खान कालम खान (नमुना, अमरावती) आणि एक महिला अशी संशयितांची नावे आहेत.तहसील कार्यालयाने महापालिकेच्या शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधितांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची पडताळणी करण्याविषयी कळवले होते. त्यानंतर तपासणी करण्यात आली, त्यातून या सहा जणांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांमध्ये खोडतोड आणि बनावट कागदपत्रे जोडल्याचा प्रकार निदर्शनास आला, यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात आला होता.
या अहवालाच्या आधारे गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. संशयितांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या ३३६ (३), ३४० (२) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात आता अमरावती जिल्ह्यातील आरोपींची संख्या १४ वर पोहचली आहे.गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात २.२३ लाख बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी जन्म दाखल्यांसाठी अर्ज केले आहेत. ९७ टक्के अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांचे असून त्यांनी खोटे कागदपत्रे सादर करून हे दाखले मिळवले आहेत. ५४ शहरांमध्ये अशी प्रकरणे निदर्शनास आली आहे.हे एक मोठे षडयंत्र आहे. विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातही बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे जन्म दाखले मिळविण्यात आले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी विविध ठिकाणी तक्रारी दाखल केल्या होत्या, तहसील कार्यालयांनी त्याची दखल घेत पडताळणी सुरू केली होती.