नागपूर : पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे हवामानात वेगाने बदल होत आहेत. त्याचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागले असून दोन दशकांमध्ये जगातील ५६ टक्क्यांहून अधिक महासागरांचा रंग लक्षणीयरित्या बदलला आहे. रंगांमधील हा बदल मानवी दृष्टी पलिकडचा असल्याचे अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी’ आणि इतर संस्थांच्या संशोधकांनी निसर्ग शोधपत्रिकेत प्रकाशित केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.
विषुववृत्ताजवळील प्रदेशात महासागरांचा रंग हळूहळू हिरवा झाला आहे. महासागरांच्या पृष्ठभागाच्या परिसंस्थेत बदल झाल्याचे त्यातून स्पष्ट होते. ‘फायटोप्लँक्टन’ या वनस्पतीसारख्या सूक्ष्मजीवांत असलेल्या ‘क्लोरोफिल’या हिरव्या रंगद्रव्यामुळे महासागरांच्या पाण्याचा हिरवा रंग होतो. त्यामुळे शास्त्रज्ञ ‘फायटोप्लँक्टन’चा हवामान बदलाला मिळणारा प्रतिसाद पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हवामान बदलाचा कल लक्षात येण्यापूर्वी ‘क्लोरोफिल’मधील बदलांचा मागोवा घेण्यासाठी सुमारे तीन दशके लागतील, असे संशोधकांनी यापूर्वीच्या संशोधनाच्या आधारे सांगितले.
राष्ट्रीय समुद्रविज्ञान केंद्रातील संशोधक बी. बी. कैल आणि त्यांच्या पथकाने २००२ ते २०२२ दरम्यान उपग्रहांद्वारे टिपलेल्या निरीक्षणातून पृथ्वीवरील सर्व सात महासागरांच्या रंगांचे संख्यात्मक विश्लेषण केले. एका वर्षांत प्रादेशिकदृष्टय़ा ते कसे बदलतात हे पाहून त्यांनी सुरुवातीला रंगांच्या नैसर्गिक फरकांचा अभ्यास केला. नंतर दोन दशकांमध्ये वार्षिक फरक कसा पडला, याचा अभ्यास केला. हवामान बदलांचा महासागरांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी त्यांनी हरितगृहवायूंसह आणि हरितगृहवायूंशिवाय असे दोन आराखडे तयार केले. यापैकी हरितगृहवायूंच्या आराखडय़ाने निम्म्या महासागरांचा रंग २० वर्षांत बदलण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. तो कैल यांनी वर्तवलेल्या उपग्रह माहितीच्या विश्लेषणाच्या जवळपास जाणारा होता.
काय घडतेय?
विषुववृत्ताजवळील प्रदेशात महासागरांचा रंग हळूहळू हिरवा झाला आहे. महासागरांच्या पृष्ठभागाच्या परिसंस्थेत बदल झाल्याचे त्यातून स्पष्ट होते. ‘फायटोप्लँक्टन’ या वनस्पतीसारख्या सूक्ष्मजीवांत असलेल्या ‘क्लोरोफिल’या हिरव्या रंगद्रव्यामुळे महासागरांच्या पाण्याचा रंग हिरवा होतो, असे ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या संशोधनात म्हटले आहे.