नागपूर : झारखंडच्या जंगलात प्रवेश केलेल्या ‘झीनत’ या वाघिणीला परत आणण्यासाठी ओडिशाच्या वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात १४ नोव्हेंबरला या वाघिणीला स्थलांतरित करण्यात आले होते.
तीन वर्षांच्या वाघिणीला २५ नोव्हेंबरला सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर दहा दिवसांनी या वाघिणीला सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात आले. अलीकडेच या वाघिणीने सिमिलीपालच्या जंगलातून झारखंडच्या जंगलात प्रवेश केला होता. ‘झीनत’ या वाघिणीला लावलेल्या ‘रेडिओ कॉलर’मुळे तिच्या झारखंडमधील प्रवेशाची माहिती मिळाली. आताही ओडिशा वनविभीागाचे अधिकारी तिच्या रेडिओ कॉलरवरुन मिळणाऱ्या माहितीच्या माध्यमातून तिच्या हालचालीचा मागोवा घेत आहेत. झारखंडमधील चकुलिया रेंजमधील भातकुंडा पंचायत अंतर्गत चियाबंदी येथील सिधो-कान्हो चौकाजवळील जंगलात ही वाघीण रेल्वे रुळ ओलांडल्यानंतर पोहोचली. ओडिशा आणि झारखंड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी झीनतच्या स्थानाचा मागोवा घेतला. या वाघिणीला पकडण्यासाठी आणि सिमिलीपालला परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली. वाघिणीला पकडण्याच्या प्रयत्नात त्यांनी तीन म्हशींना झारखंडच्या जंगलात नेले आहे. वाघिणीला स्थलांतरित करण्यासाठी वाहनाला विशेष पिंजराही सज्ज ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून ओडिशात कृत्रिम स्थलांतर करुन आणलेली ही वाघीण नैसर्गिक स्थलांतर करुन झारखंडमध्ये पोहोचली. आता पुन्हा तिला झारखंडवरुन कृत्रिम स्थलांतर करुन ओडिशा येथे आणण्यात येणार आहे. २७ ऑक्टोबरला महाराष्ट्रातून आणलेली ‘यमुना’ ही वाघीण सुमारे एक महिन्यापासून सिमिलीपालच्या जंगलात फिरत आहे. तिचेही आरोग्य चांगले आहे.
हेही वाचा…“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
आनुवंशिक विविधता वाढवण्यावर भर
सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या संख्येला पुरक आणि आनुवंशिक विविधता वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन वाघिणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २० ऑक्टोबरला या प्रकल्पाची सुरुवात झाली. पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याने त्यासाठी परवानगी दिली. ओडिशा व महाराष्ट्र वनविभागाच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
हेही वाचा…लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
‘कन्झर्वेशन क्लस्टर’
ओडिशातील सिमिलीपाल या व्याघ्रप्रकल्पात एक-दोन नाही तर तब्बल दहा ‘मेलेनिस्टिक’ वाघांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे, ज्याठिकाणी देशातील सर्वच काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ वाघ आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. या व्याघ्रप्रकल्पाला त्याच्या आनुवंशिक रचनेमुळे एक वेगळे ‘कन्झर्वेशन क्लस्टर’ म्हणून ओळखले जाते.