लोकसत्ता टीम
बुलढाणा : देशाला अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल समाज माध्यमा (सोशल मीडिया) वर आक्षेपार्ह मजकूर( पोस्ट) टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात समोर आला आहे.
महात्मा गांधी जयंती जिल्ह्यात साजरी करण्यात आली असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे चिखली तालुक्यासह जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान, हा आक्षेपार्ह मजकूर टाकणारा युवक चिखली मधील युवक असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश संतोष टिपरे असे आरोपीचे नाव असून तो चिखली शहरातील रोहिदास नगर भागातील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी युवक हा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असून त्याच्याकडे ” सोशल मीडिया विंग’ ची जवाबदारी असल्याचे वृत्त आहे.
आणखी वाचा-चंद्रपूर : धक्कादायक! ‘बीएएमएस’च्या विद्यार्थिनीचा वसतिगृहात झोपेतच मृत्यू…
तत्काळ कारवाई
चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश टिपरे याने त्याच्या ‘फेसबुक अकाउंट’ वर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह फोटो व त्याखाली आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. यामुळे सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता पाहता चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी तातडीने कारवाई केली. आरोपी यश टिपरेला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपी यश टिपरे याला चिखली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. चिखली न्यायालयाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीची बुलडाणा जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्याची तेथे रवानगी करण्यात आली.
आणखी वाचा-भाजप आमदारांच्या मतदारसंघासाठीच सरकारी योजना आहेत का? बांधकाम कामगारांसाठी देशमुखांचा मोर्चा
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात चिखली पोलिसांनी तातडीने कारवाई केली. सहाय्यक फौजदार विष्णू नेवरे, प्रकाश शिंदे, विजय गीते, विजय किटे, राजेश गौंड, सुनील राजपूत यांनी ही कारवाई केली. यामुळे शहर परिसरात निर्माण झालेला तणाव निवळला.