नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केलेल्या एका विधानाची सध्या खूप चर्चा आहे. भय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात मराठी भाषेबाबत एक विधान केले. त्यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला असून थेट विधिमंडळ अधिवेशनात याचे पडसाद उमटले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या ग्रंथामधील चुकीचा संदर्भ देऊन समाज माध्यमावर चुकीची पोस्ट करण्यात आल्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. गोळवलकर गुरुजींचा संदर्भ देऊन छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट दोन फेसबुक खात्यांवरून टाकण्यात आली. याविरोधात नागपुरात ‘संवेदना’ परिवार संस्थेच्या वतीने महाल परिसरात मोठे आंदोलन करण्यात आले. तसेच कोतवाली पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
प्रशांत कोरटकर याने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून राज्यभर वातावरण तापले. विधिमंडळातही याचे पडसाद उमटले आहेत. आता गोळवलकर गुरुजी यांच्या लिखानाचा संदर्भ देऊन छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकण्यात आल्या आहेत.
प्रकरण काय?
फेसबुक आणि इतर समाज माध्यमांवर शेमलेस इरा आणि दि न्यू इंडिया या नावाने असलेल्या दोन खात्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या लिखाणाचा संदर्भ देत छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या पोस्ट्स टाकण्यात आल्या. ‘शेमलेस इरा’ या नावाचे खाते चालविणाऱ्या व्यक्तीने ‘एनएच-३४, इंग्लिश बाजार, इंडिया ७३२१२७’ असा पत्ता दिलेला असून, स्वतःला पब्लिक अँड गव्हर्नमेंट सर्व्हिसेस म्हटलेले आहे. दि न्यू इंडिया चालविणाऱ्या व्यक्तीने thenewindia१५८२@gmail.com असा मेल एड्रेस दिलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत गोळवलकर गुरुजी यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात काही बदनामीकारक विधाने असल्याचा दावा या पोस्ट्सच्या माध्यमातून केला जात आहे. हा दावा निराधार आहे. परंतु, त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची व शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संवेदना परिवाराने केली आहे.