भंडारा : दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने इंस्टाग्रामवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवत धार्मिक भावना दुखावतील , अशी स्टोरी टाकल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि अखेर त्या तरुणाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका तरुणाने त्याच्या फेसबुक पेजवर नमाज पठण करतानाचा फोटो पोस्ट करत त्यावर आक्षेपार्ह विधान केले. या पोस्टमुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्याने काही मुस्लिम समाज बांधवांनी गुरूवारी मध्यरात्री भंडारा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणात तरुणा विरोधात तक्रार दाखल करून रात्री उशीरा त्याला अटक केली.

भंडारा येथील मिथून बिछवे (वय २२) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने फेसबुक पेजवर नमाज पठण करतानाचा एक फोटो आणि त्या खाली आक्षेपार्ह विधान लिहून पोस्ट शेअर केली. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या २५ ते ३० नागरिकांनी भंडारा पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि अशा प्रकारची पोस्ट मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचे सांगत बिछवे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. रात्री उशिरा मिथुन बिछवे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आणि अटक करण्यात आली.

अत्यंत शांत शहर अशी भंडारा शहराची ओळख असताना काही उतावीळ आणि अपरिपक्व तरुणामुळे समाजात तेढ निर्माण होत असून शहराची शांतता धोक्यात येत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्र आणून त्यांच्याशी चर्चा करणे सुरू आहे. आज कॉर्नर सभा घेऊन मुस्लिम बांधवांशी सुद्धा याबाबत चर्चा केली आहे.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया भंडारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांनी लोकसत्ता शी बोलताना दिली. तसेच तरुणांनी अविचाराने अशाप्रकारे कोणतेही पाऊल उचलून स्वतःचे भविष्य धोक्यात आणू नये असा सल्लाही सूर्यवंशी यांनी दिला आहे.

Story img Loader