नागपूर : अहमदनगरच्या एका बेरोजगार युवकाने पोलीस विभागात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंधाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. सध्या गर्भवती महिला पोलीस उपनिरीक्षकाने सोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास नागपुरात वर्ग केला. या प्रकरणाची नागपूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा, फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

३१ वर्षीय पीडित तरुणीची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. २०२३ मध्ये ती पोलीस रुजू झाली. दरम्यान लग्नासाठी तिने विवाह संकेतस्थळावर ‘बायोडाटा अपलोड’ केला. तिथे ३२ वर्षीय आरोपी युवकाचा बायाडोटा होता. त्यात त्याने शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटदार असून इतरही व्यवसाय असल्याची नोंद केली होती. बायोडाटा पाहिल्यावर तो पीडित तरुणीच्या संपर्कात आला. डिसेंबर २०२३ मध्ये तो शहरात आला. महिला पोलीस उपनिरीक्षकाला हॉटेलमध्ये घेऊन गेला. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नापूर्वीच ती महिला अधिकारी गर्भवती राहिली. त्यामुळे तिने लग्नाची गळ घातली. दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना प्रेमप्रकरणाबाबत माहिती दिली. दोघांच्याही कुटुंबियांनी लग्न करण्याची तयारी दर्शविली. २०२४ मध्ये आरोपीने तरुणीसोबत लग्न केले. लग्नानंतर आरोपीचे बींग फुटले. पती बेरोजगार असून कुठलाही कामधंदा करीत नाही. एवढेच काय तर त्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना काही ‘न्यूड फोटो आणि व्हिडिओ मोबाईलने काढले होते. ते व्हिडिओ तो एका मैत्रिणीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवित होता. ही बाब तिच्या लक्षात आली. त्यामुळे तिने त्या तरुणाला याबाबत जाब विचारला. त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, त्याच्याकडे अनेक अश्लिल व्हिडिओ असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे आता त्या तरुणाला अटक करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>नागपूर : खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हप्तेखोरीतून लाखोंची उलाढाल; नागरिकांकडून चौकशीची मागणी

दारु पिऊन मारहाण

आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल आणि मेलही हॅक केला. आरोपी हा महिला पोलीस अधिकाऱ्याला दारु पिऊन मारहाण करीत शारीरिक छळ करायला लागला. धमकी देऊन महिलेचा पगार घ्यायला लागला. बेरोजगार असल्यामुळे तो पत्नीच्या पैशावर जगत होता. तो पत्नीचा पगार झाला की लगेच एटीएमने काढून घेत होता. तसेच तिला रोज मारहाण करीत होता. अलिकडेच महिला अधिकारी प्रसुती रजेवर गेली असून तिने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.