चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपला विजय मिळावा, यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान बहेबतुल्लहा शाह बाबा दर्गा येथे चादर अर्पण करून माथा टेकवला. सोबतच माता महाकालीच्या चरणीही ते नतमस्तक झाले. आता नड्डा यांच्या दर्गा व मंदिर भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा- ‘मार्ड’च्या संपाने यवतमाळात रुग्णसेवा कोलमडली
नड्डा चंद्रपूर येथे ‘विजय संकल्प’ सभेसाठी सोमवारी चंद्रपुरात आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ५४५ पैकी २८२ जागा जिंकत वर्चस्व स्थापित केले. ही संख्या अजून वाढावी म्हणून जेथे भाजपचा खासदार नाही अशा लोकसभा मतदारसंघाचा नड्डा दौरा करीत आहे. या दौऱ्याची सुरुवात चंद्रपुरातून झाली. पहिल्या टप्प्यात देशातील १४४ मतदारसंघ असून यात महाराष्ट्रातील १६ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात भाजपचा विजयी संकल्प पूर्णत्वाला जाऊ दे, असे साकडे घालत नड्डा यांनी सभास्थळाला लागून असलेल्या बहेबतुल्लहा शाह बाबा दर्गा येथे चादर अर्पण केली. सोबतच शहरवासीयांची आराध्य दैवत असलेल्या महाकालीच्या चरणीही ते नतमस्तक झाले. यावेळी नड्डांसोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर यांच्यासह भाजपची नेते मंडळी होती.