सुमित पाकलवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : जिल्हा हिवताप कार्यालयातील ‘स्टोअर रूम’मधून झालेल्या ‘मायक्रोस्कोप’ चोरीच्या प्रकरणातील घटनाक्रमावरून अधिकारी व कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही दिवसांपूर्वी या आगळ्यावेगळ्या चोरीची पोलिसात तक्रार देण्यात आली. परंतु १८ ‘मायक्रोस्कोप’ लंपास झाल्यानंतरही नेमकी चोरी केव्हा झाली हे कुणालाच ठावूक नाही. त्यामुळे ही चोरी नेमकी कुणी केली याविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

१२ जुलैरोजी गडचिरोली पोलिसात जिल्हा हिवताप कार्यालयाच्या भांडारपालने ‘स्टोअर रूम’मधून पाच लाखांचे १८ ‘मायक्रोस्कोप’ चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. मे महिन्यात रक्ताचे नमुने तपासणीसाठी वापरण्यात येणारे एकूण २२ यंत्र खरेदी करण्यात आले होते. त्यातील चार संबंधित विभागांना वाटप करण्यात आले. त्यापैकी १८ यंत्र शिल्लक होते. दरम्यान चोरट्यांनी हे शिल्लक यंत्र लंपास केले. ‘स्टोअर रूम’मधील स्वच्छतागृहातील खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश केला असावा, असे तक्रारीत नमूद आहे. परंतु नेमकी चोरी केव्हा झाली हे कार्यालयातील कुणालाच माहिती नाही. त्यामुळे १५ जून ते १२ जुलै दरम्यान चोरी झाल्याची शक्यता तक्रारीत वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा >>>कारधा पुलावर लागले कायमस्वरूपी बॅरिकेटस्; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

विशेष म्हणजे २०२०-२१ मध्येदेखील अशाचप्रकारची चोरी याच कार्यालयात उघडकीस आली होती. यातून धडा घेत अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ‘स्टोअर रूम’मध्ये ‘सीसीटिव्ही’ बसवणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. चोरट्यांनी केवळ यंत्र नेले आणि रिकामे खोके तिथेच टाकून दिले. ‘मायक्रोस्कोप’ सारखे यंत्र चोरीला जाणे हे पहिलेच प्रकरण असल्याचे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे हे यंत्र चोरीला गेले की केवळ कागदावरच उपलब्ध होते. याचा तपास होणे देखील गरजेचे आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मोडक यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा >>>बुलढाणा: जैन समाजाचा चिखलीत मूक मोर्चा

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

‘मायक्रोस्कोप’ चोरीने पोलिसही चक्रावले आहे. ज्या ठिकाणी हे कार्यालय आहे. त्याठिकाणी आजपर्यंत चोरीचे प्रकरण कधीच घडले नाही. मग महागडे यंत्र, साहित्य आणि औषधी असलेल्या ‘स्टोअर रूम’ परिसरात सीसीटिव्ही का बसविण्यात आले नाही. हे यंत्र जेव्हा आणण्यात आले तेव्हा कुणीच कसे उपस्थित नव्हते. चोरांनी केवळ ‘मायक्रोस्कोप’च का लंपास केले. चोरी झाल्याचे उशिरा लक्षात का आले. असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. सोबतच यात कार्यालयातील कुणाचा सहभाग आहे काय, याचा तपास देखील पोलीस करत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Officers and employees under suspicion in microscope theft case ssp 89 amy
Show comments