नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी आपल्या विविध उपक्रमांनी कायमच चर्चेत असते. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची १४ एप्रिलला जयंती आहे. बार्टीच्या वतीने बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते. तसेच विविध उपक्रमांचे आयोजनही केले जाते. मात्र, यंदा बार्टीच्या वतीने थेट लंडन येथे बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बार्टीने दोन दिवस भीमजयंतीच्या औचित्यांनी आंतरराष्ट्रीय परिषद लंडन येथे ठेवली आहे. यासाठी बार्टीच्या महासंचालक सुनील वारे यांच्यासह काही अधिकारीही लंडनला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बार्टीच्या अधिकाऱ्यांची लंडनवारी अशी चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरू आहे.
हेही वाचा – नाना पटोलेंच्या कारला अपघात; उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक
दोन दिवस भीमजयंतीच्या औचित्यांनी बार्टीने अंतरराष्टीय परीषद लंडन येथे ठेवली आहे. तर बार्टीने एकदम लंडन येथे परिषद ठेवल्याने याचा सर्व खर्च करणार कोण असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. बार्टी ही सामाजिक संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या उपक्रमासाठी त्यांनी पैसे खर्च करावे अशी समाजाची अपेक्षा. मात्र, मागील काही वर्षात विद्यार्थी उपक्रमांवरील खर्चाला कात्री लावली जात आहे. तर दुसरीकडे लंडनला परिषदा होत असल्याने आक्षेप घेतला जात आहे.
या परिषदेला महासंचालकासह काही अधिकारी लंडनला जाणार आहेत. या परिषदेत त्यांचा अजेंडा काय? हा खर्च कुणाच्या निधीतून होणार आहे? यातून काय साध्य करणार आहेत. त्यांनी खर्च तपशील व कार्यक्रमाची माहिती का दिलेली नाही? गुप्तता का व कशासाठी? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आधीच बार्टीला निधीची कमतरता आहे. त्यात अशा लंडनवारीने काय साध्य होणार आहे? वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न देता ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली केला जात असलेला हा प्रकार पैशांचा अपव्यय नव्हे का! – कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँड्स.