लोकसत्ता टीम
गडचिरोली : विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना एका तरुणाने “मोदी सरकार की भारत सरकार” यावरून चांगलेच खडे बोल सुनावले. चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावात आलेल्या वाहनावर ‘मोदी सरकार’ असा उल्लेख असल्याने संतापलेल्या युवकाने अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. या घटनेचा व्हिडीओ जिल्हाभरात ‘व्हायरल’ झाला आहे.
भारत सरकारने केलेल्या कार्याचा लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नागरिकांना विविध लाभ देण्यासाठी गावागावात प्रशासनाकडून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त गावात आलेल्या वाहनांवर मोदी सरकार असा उल्लेख होता. यामुळे संतापलेल्या युवकाने कार्यक्रमात चांगलाच गोंधळ घातला.
आणखी वाचा-अमरावती : नंबर प्लेट बदलून धावत होत्या बस, ‘आरटीओ’ने…
यासंदर्भातील चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्याने नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यात एक युवक उपस्थित अधिकाऱ्यांना यात्रा असल्याचे एक दिवस आधी का कळविण्यात आले नाही, असा प्रश्न करताना दिसून येतोय. सोबतच हे मोदी सरकार आहे की भारत सरकार असेही विचारताना दिसत आहे. युवकाने विचारलेल्या प्रश्नावर उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. अखेर गोंधळातच कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. सद्या या व्हिडिओची जिल्ह्याच चर्चा आहे.