नागपूर : मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे नागपूर देशभरात चर्चेत आहे. शहराचा एकही असा भाग नाही जेथे रस्ते, पूल किंवा उड्डाणपुलाचे काम सुरू नसेल. वस्ती वर्दळीची असो किंवा दाटीवाटीची. खोदकाम, सिमेंट पिल्लर्सची उभारणी, क्रशर, सिमेंट मिक्सरच्या आवाजाने नागपूरकर त्रस्त झाले आहेत. मात्र याच शहरात एक रस्ता असाही आहे की जो तब्बल २५ वर्षांपासून रखडला आहे. विशेष म्हणजे शासनाने बांधकामासाठी पैसे देऊनही त्याचे काम सुरू होऊ शकले नाही. त्याचे नाव आहे जुना भंडारा मार्ग. या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिअधिग्रहनाची अधिसूचना काढली आहे.
सन २००० मध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी मंजूर केलेल्या ४३ डीपी रस्त्यांपैकी एक असलेल्या जुन्या भंडारा रस्त्यांचे रुंदीकरण अजूनही रखडले आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या मंजुरीला ७ जानेवारी २०२५ ला २५ वर्ष पूर्ण झाले. सुरुवातीला रस्त्याच्या रुंदीकरणात अनेक घरे तोडावी लागणार होती. त्यासाठी घसघशीत मोबदलाही शासनाने देऊ केला होता. तब्बल ६८ लोकांनी त्यांच्या हक्काची जागा शासनाला देऊ केली. त्यांना ३० कोटींचा मोबदलाही देण्यात आला. पण रस्त्यासाठी आणखी जागा हवी होती. ते देण्यास कोणी तयार नव्हते. मोबदल्याचाही प्रश्न होता. त्यामुळे रुंदीकरणाचे काम रखडले ते तब्बल २५ वर्ष. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी राज्य शासनाने ३३९ कोटी रुपये दिले आहे. रस्ते बांधणी रेंगाळल्याने प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने १९ जुलै २०१७ ला निकाल देऊन रस्ता बांधणी करण्याचे आदेश दिले होते. त्यालाही आता ७ वर्षे झाली आहेत. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर ३१ डिसेंबर २०२४ ला रस्त्याच्या उर्वरित जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिसूचना काढली.
हेही वाचा – नागपूर, पुणे, मुंबईकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस
हेही वाचा – तरुणांनो प्रेम करा, पण…
या रस्त्यासाठी मध्य नागपूर विकास आघाडीतर्फे भूषण दडवे व रवींद्र पैगवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आ. प्रवीण दटके यांनीही रुंदीकरणासंदर्भात गुरुवारी महापालिकेत बैठक घेतली होती. यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या मुदतीत भूसंपादनाचे करण्याचे निर्देश दिले. पंचवीस वर्षानंतर प्रशासनाला जाग आली असली तरी ते काम पूर्णत्वास जाणार का हा प्रश्न कायम आहे. कारण यापूर्वीही रस्ते रुंदीकरणासाठी प्रयत्न झाले होते. पण त्याला विरोध झाला होता.