यवतमाळ : जुन्या निवृत्तीवेतन योजनेसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सोमवारी राज्य कर्मचारी संघटना समन्वय समितीने मागे घेतला. समन्वय समितीने सर्वांना विश्वासात न घेता एकतर्फी संप मागे घेतल्याचा आरोप करून यवतमाळातील अनेक कर्मचारी संघटनांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली होती.
आधी ठरल्याप्रमाणे आज मंगळवारी येथील आझाद मैदानात कुटुंबासह महामोर्चासाठी शेकडो कर्मचारी एकत्र आले. मात्र समन्वय समितीच्या भूमिकेविरोधात जाऊन संप सुरू ठेवला तर कर्मचारी कायदेशीर अडचणीत येतील हा मुद्दा समोर करून मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी हा संप मागे घेत कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर आज दुपारी कर्मचारी कार्यालयात रूजू झाले आणि राज्य कर्मचारी संघटना समन्वय समिती व जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांमध्ये संघर्षाचा प्रसंग टळला.
स्थानिक आझाद मैदानात सकाळी ११ वाजतापासून बहुतांश विभागांचे कर्मचारी सहकुटुंब मोर्चासाठी उपस्थित झाले. शेकडो कर्मचारी जमल्यानंतर येथे स्थानिक कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. राज्य कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी कुठल्याही ठोस निर्णयाशिवाय मुख्यमंत्र्यांच्या शब्दांवर व समितीच्या संभाव्य अहवालावर विश्वास ठेवून संप मागे घेत लाखो कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप अनेक वक्त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा >>> बुलढाणा : युद्धात जिंकले ‘तहात’ हरले! विचित्र मानसिकतेत कर्मचारी कामावर परतले…
राज्यात बहुतांश जिल्ह्यात संप मागे घेण्यात येऊन कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाले. यवतमाळात हा संप सुरू ठेवला तर सरकार ही कृती बेकायदेशीर ठरवून कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात ओढतील. त्यामुळे हा संप मागे घेऊन सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करायची. हा अहवाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने नसल्यास आणि कर्मचाऱ्यांच्या जुन्या निवृत्तीवेतनासह सर्वच मागण्यांचा त्यात विचार न झाल्यास तीन महिन्यांनंतर कर्मचारी अधिक तीव्रतेने आंदोलन करतील, असे आज यवतमाळ येथे झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत ठरले, अशी माहिती मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बुटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
राज्य कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. मात्र, कायदेशीर अडचण उद्भवू नये म्हणून तूर्तास संप मागे घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर तत्काळ रूजू होण्याचे आवाहन केले आहे, असे बुटे यांनी सांगितले. या निर्णयानंतर मोर्चासाठी दूरवरून आलेले असंख्य कर्मचारी गावी परत गेले तर यवतमाळातील कर्मचाऱ्यांनी मध्यान्हपूर्व रूजू होण्यासाठी कार्यालयांकडे धाव घेतली.