नागपूर : महामेट्रोने अनोखी युक्ती वापरत शहरातील भंगारवाल्यांकडून जुन्या टाकाऊ वस्तू गोळा करून दीक्षाभूमीजवळील मेट्रो भवनात अनोखे उपाहारगृह साकारले. जुन्या स्कुटर, कारपासून टेबल तर सायकलवर हात धुण्यासाठीचे पात्र (बेसिन) तयार करण्यात आले. येथे बसून पदार्थाचा आस्वाद घेताना वेगळाच आनंद मिळतो.
मेट्रोमध्ये मोठ्या संख्येत अभियंते कार्यरत आहेत. त्यांच्यातील कलात्मकता हेरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाकाऊ वस्तूंपासूनचे उपाहारगृह मेट्रो भवनात उभारण्याचा संकल्प केला. यासाठी लागणाऱ्या टाकावू वस्तूंची जुळवाजुळव करण्यासाठी शहरातील भंगारवाल्यांची यादी तयार करण्यात आली. त्यांच्याकडून जुन्या कार, स्कुटर, सायकल, टेबल-खुर्च्या, खिडक्या, मेट्रोच्या कामादरम्यान भंगारात निघालेले लोखंडी ड्रम, गाड्यांचे टायर्ससह इतरही वस्तू गोळा करण्यात आल्या.
त्यानंतर अभियंत्यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून टायर्स, जुन्या स्कुटर, कारचा वापर करून टेबल, सायकलच्या मागच्या स्टॅन्डवर बेसिन, जुन्या पाण्याच्या ड्रमचे छोटे टेबल तयार करण्यात आले. जुन्या टेबल-खुर्च्यांना नवीन रूप देण्यात आले. जुन्या खिडक्यांचा आकर्षकपणे वापर करून त्यांना दर्शनी भागात लावण्यात आल्याने उपाहारगृहाला वेगळाच ‘लूक’ आला. हे उपाहारगृह महामेट्रोतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. येथे विविध कामासाठी बाहेरून येणाऱ्यांनाही प्रवेश असून ते सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
कार स्टेफनीचा टेबल
कारच्या चाकाच्या (स्फेफनी) लोखंडी रिंगला काच लावून त्याचा टेबल तयार करण्यात आला. यावर प्लेट ठेवल्यावर खवय्यांना बसण्यासाठी टायरवर फोम लावून आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा : अमरावती : शेतकरी महिलेची बलात्कारानंतर दगडाने ठेचून हत्या
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या संकल्पनेतून टाकाऊ वस्तूंपासून उपाहारगृह साकारण्यात आले. त्यासाठी मेट्रोमधील अभियंत्यांचीही मेहनत घेतली. जुन्या वस्तूंचे जतन हा सुद्धा हेतू होता. – अनिलकुमार कोकाटे, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग), महामेट्रो, नागपूर.