राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरू असून गुरुवारी बी.ए. (ॲडिशनल) सहावे सत्र इंग्रजी साहित्य विषयाच्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. या विद्यार्थ्यांची ही परीक्षेची अखेरची संधी होती. त्यानंतर हा अभ्यासक्रम बंद होणार आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागल्याने नव्याने परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा >>>कोट्यवधींचे व्यवहार ठप्प! महाबँक कर्मचाऱ्यांचा संप, अकोल्यात नोकर भरतीसाठी कर्मचाऱ्यांद्वारे दुचाकी फेरी
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये रोज नवीन समस्या समोर येत आहेत. त्यात आता बी.ए. (ॲडिशनल) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळताच विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तशी तक्रारही केली. बी.ए. (ॲडिशनल) अभ्यासक्रमाच्या सहाच्या सत्राच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची ही शेवटची संधी देण्यात आली होती. असे असतानाही आता जुन्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याचा धोका आहे. त्यामुळे आता नव्याने परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा >>>‘सामना’तील अग्रलेखावर काँग्रेसचे प्रत्युत्तर, मित्र पक्षाच्या निर्णयावर मत व्यक्त करणे अयोग्य
पाली प्राकृतमध्येही अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न
पाली प्राकृत विषयाच्या पदव्युत्तर तृतीय सत्राची गुरुवारी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना ४० टक्के अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच नव्याने परीक्षा घ्यावी किंवा चुकांचे गुण द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.