लोकसत्ता टीम
नागपूर : देव दर्शनासाठी काशीला निघालेली एक वृद्ध महिला नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली. पण काही वेळाने गाडी सुटली. ती फलाटावरच राहिली. कनकाकुंजम्मा नारायणन (८२) रा. एर्नाकुलम ( केरळ )असे त्या वृद्धेचे नाव आहे. ही महिला त्यांच्या शेजऱ्यांसह काशीला जात होती. त्या २२६६९ एर्नाकूलम पाटणा एक्स्प्रेसच्या एस-६ बोगीने प्रवासाला निघाल्या. १३ नोव्हेंबरच्या सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आली. यावेळी त्या गाडीतून खाली उतरल्या.
आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर गडचिरोलीत नक्षल्यांकडून तरुणाची हत्या
दरम्यान काही वेळातच गाडी पुढील प्रवासाला निघाली. वयोवृद्ध असल्याने त्यांना गाडीत चढता आले नाही. गाडी काही दूर गेल्यानंतर सहकाऱ्यांना कनकाकुंजम्मा दिसत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी इतर डब्यातही त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या मिळून आल्या नाही. अखेर सहकाऱ्यांनी कनकाकुंजम्मा यांच्या मुलाला फोन करून माहिती दिली. कुटुंबीय व सहकाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र,काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मुलगा दिलीपकुमार नारायणन हे तातडीने नागपुरात आले व त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.